नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 10 हजारावर विक्री होणाऱ्या तुरीला सध्या काय दर मिळतोय, आगामी काळात भाव कसे राहणार? वाचा…
Tur Price 2025 : गेल्या एका महिन्याच्या काळात तुरीच्या दरात घसरण झाली असून यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. आता कुठं नव्या हंगामातील तूर बाजारात विक्रीसाठी येत आहे आणि अशातच दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. मंडळी, 2024 च्या मान्सून हंगामामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या काळात राज्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला अन यामुळे तुरीच्या पिकाला पोषक वातावरण राहिले अन तूर उत्पादनात वाढ झाली आहे.
पावसाळी हंगामात काही ठिकाणी संततधार व मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली अन याचा खरीप पिकांना फटका बसला पण खरिपातील तुरीचे पीक चांगले आले आहे. आता राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या प्रमुख तूर उत्पादक विभागांमध्ये तूर काढणीला वेग आला आहे.
पण तुर काढणीला सुरुवात होताच तुरीच्या बाजारभावात घसरण झाली आहे. जसजशी तुरीची काढणी होईल तसतशी बाजारात विक्रीला येऊ लागली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 या काळात तुरीला १० हजारांचा भाव होता पण आता हा भाव सात हजारांवर आलाय.
दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पेरणी क्षेत्र असलेल्या मराठवाडा व विदर्भातील तूर आता बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तुरीच्या खरेदी दरात येत्या काही दिवसांनी आणखीन घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बाजारात तुरीची म्हणावी तशी आवक होत नाही पण येत्या काही दिवसांनी आवक वाढेल आणि याचा बाजारभावावर दबाव येईल असे म्हटले जात आहे. सध्या साधारण लाल रंगाची तूर सात हजार ते साडेसात हजाराने विक्री होत आहे अन पांढऱ्या तुरीला त्यापेक्षा कमी दर मिळत आहे.
म्हणून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तुरीचे दर सात हजार रुपयांच्या आत आले तर शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रांवर विकण्याचा पर्याय आहे. मात्र, हमी भाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू नसल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तुरीची हमीभावात खरेदी लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हमीभाव केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी ई-पीक नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीक नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच हमीभाव केंद्रावर नोंद करता येते.
मात्र, बहुतेक शेतकऱ्यांनी तूर पीक ई-पीक नोंद केली नसल्याची हमीभाव केंद्रावर विक्रीची अडचण येणार असेही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात तुरीला काय भाव मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण तुरीची आवक वाढल्यानंतर बाजार भाव घसरू शकतात आणि यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.