For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Agriculture Commodity Market: सोयाबीन, कांदा, मका, तूर भावात घसरण! कापूस दरात चढ-उतार…. शेतकऱ्यांसमोर नवा संकटांचा डोंगर

06:51 PM Mar 17, 2025 IST | Krushi Marathi
agriculture commodity market  सोयाबीन  कांदा  मका  तूर भावात घसरण  कापूस दरात चढ उतार…  शेतकऱ्यांसमोर नवा संकटांचा डोंगर
Advertisement

Agriculture Commodity Market:- अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यात सुरू असलेले व्यापारयुद्ध अद्यापही चालू आहे. या देशांनी आयात करवाढीची अंमलबजावणी २ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली असली तरीही, जागतिक बाजारपेठेवर त्याचा मंदीचा प्रभाव जाणवत आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या आयात शुल्कामुळे शेतीमालावरील परिणाम वाढत असून, यामुळे जागतिक बाजारातील कृषी-उत्पादनांच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. २०२३-२४ मध्ये सोयाबीन, मका, कापूस, तांदूळ आणि गहू यांसारख्या मुख्य पिकांच्या जागतिक वार्षिक किमती २०२२-२३ च्या तुलनेने घसरल्या होत्या. त्यात आता या व्यापारयुद्धाचा अधिक प्रभाव पडला आहे. अमेरिकेच्या कृषी खात्याने (USDA) ११ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या जागतिक कृषी पुरवठा आणि मागणी अहवालानुसार (World Agricultural Supply and Demand Estimates), फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रमुख कृषी वस्तूंच्या किमती २०२३-२४ च्या तुलनेने कमी राहतील. विशेषतः मार्च २०२५ पर्यंत कापूस, गहू आणि सोयाबीनच्या किमती फेब्रुवारी २०२५ पेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतातील सोयाबीन आणि कापूस यांच्या किमती

भारतातील सोयाबीन आणि कापूस यांच्या किमती जागतिक बाजारपेठेशी समांतर चढ-उतार दर्शवतात. गेल्या दोन वर्षांत भारतातील कापूस, मका आणि सोयाबीनच्या किमती सातत्याने घसरत आहेत. यावर्षी हरभरा, हळद, कांदा आणि टोमॅटो यांच्या किमतीही घसरल्या आहेत. हरभऱ्याची आवक वाढत असून त्याचा परिणाम पुढील महिन्यांत किमतींवर दिसून येईल. कांद्याची रब्बी आवक अजून सुरू व्हायची आहे, मात्र आधीच किमती घसरल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील किमतींवर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. एकूणच, सोयाबीन आणि कापसाच्या किमती वाढण्याची शक्यता मावळली आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात कापूस आणि हरभरा वगळता सर्व प्रमुख कृषीपिकांच्या किमती घसरल्या. सोयाबीनच्या किमती १.८ टक्क्यांनी घसरल्या आहेत. हरभऱ्याच्या किमती सध्या हमीभावाच्या जवळपास आहेत. वाढत्या आवकेमुळे पुढील काही आठवड्यांत या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ११ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यातील किमतीतील चढ-उतारांमध्ये लक्षणीय बदल दिसून आले.

Advertisement

कापसाचे स्पॉट भाव

कापसाच्या बाबतीत MCX वर कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) ०.५ टक्क्यांनी वाढून ५३,३९० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. मे महिन्याचे वायदे ५४,००० रुपये तर जुलैचे वायदे ५६,००० रुपये आहेत, जे स्पॉट भावापेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहेत. सध्याच्या परिस्थितीत स्पॉट भावाने विक्री करणे फायदेशीर ठरू शकते. NCDEX वर कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, २९ मिमी) १.१ टक्क्यांनी वाढून १,४१८ रुपये प्रति २० किलोवर आले आहेत. एप्रिल वायदे १,४४७ रुपये तर नोव्हेंबर वायदे १,४९१ रुपये आहेत, जे सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी जास्त आहेत. कापसासाठी मध्यम धाग्यासाठी हमीभाव ७,१२१ रुपये आणि लांब धाग्यासाठी ७,५२१ रुपये प्रति क्विंटल आहे, मात्र सध्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा कमी आहेत.

Advertisement

मक्याचे स्पॉट भाव

मक्याच्या बाबतीत NCDEX वर खरीप मक्याचे स्पॉट भाव (छिंदवाडा) ०.४ टक्क्यांनी घसरून २,२९० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. एप्रिल वायदे ०.६ टक्क्यांनी घसरून २,३०६ रुपये झाले असून जून वायदे २,३३८ रुपये आहेत, जे सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.९ टक्क्यांनी जास्त आहेत. सध्या मका हमीभाव (२,२२५ रुपये) पेक्षा जास्त दराने विकला जात आहे.

Advertisement

हळदीचे स्पॉट भाव

हळदीच्या बाबतीत NCDEX वर स्पॉट भाव (निजामाबाद, सांगली) १.३ टक्क्यांनी घसरून १२,२४२ रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. एप्रिल वायदे किंचित घटून ११,७५४ रुपये तर मे वायदे ११,६९२ रुपये आहेत, जे स्पॉट भावापेक्षा ४.५ टक्क्यांनी कमी आहेत.

हरभऱ्याच्या स्पॉट किमती

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या आठवड्यात २.६ टक्क्यांनी घसरून ५,६५० रुपये झाल्या होत्या. या आठवड्यात त्या किंचित वाढून ५,७०० रुपये झाल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव ५,६५० रुपये असून आवक वाढती आहे, त्यामुळे भविष्यात किमती आणखी घसरू शकतात.

मुगाची स्पॉट किंमत

मुगाची हरभऱ्याच्या स्पॉट किमती बाबतीत मेरठमध्ये स्पॉट किंमत ५.७ टक्क्यांनी घसरून ७,४५० रुपये प्रति क्विंटलवर आली आहे. मुगाचा हमीभाव ८,६८२ रुपये असून हंगाम संपल्यामुळे आवक आता मंदावली आहे.

सोयाबीनच्या स्पॉट किमत

सोयाबीनच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या आठवड्यात ०.६ टक्क्यांनी वाढून ४,२१७ रुपये झाल्या होत्या, मात्र या आठवड्यात त्या १.८ टक्क्यांनी घसरून ४,१४१ रुपये झाल्या आहेत. सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये असून नवीन पिकाची आवक कमी होत असल्याने बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

तुरीची स्पॉट किमती

तुरीच्या स्पॉट किमती (अकोला) ०.१ टक्क्यांनी कमी होऊन ७,६३७ रुपये झाल्या होत्या. या आठवड्यात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून ७,५७९ रुपये झाल्या आहेत. तुरीचा हमीभाव ७,५५० रुपये आहे, आणि आवक कमी होत आहे.

कांद्याची किंमत (पिंपळगाव बसवंत) या आठवड्यात १,५४० रुपये आहे. रब्बी कांद्याची आवक एप्रिलपासून सुरू होईल, त्यामुळे किमतीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. टोमॅटोच्या स्पॉट किमती (जुन्नर, नारायणगाव) गेल्या आठवड्यात १,००० रुपये होत्या आणि त्या याच स्तरावर कायम आहेत.

Tags :