टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! केंद्र सरकारकडून कोट्यावधींची Subsidy मंजूर… जाणून घ्या कसा मिळेल फायदा?
Tomato Prakriya Udyog: केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत टोमॅटो प्रक्रिया उद्योगाला मोठे अनुदान मिळत असून, इच्छुक उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६६ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी एकूण ३६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २२ कोटी रुपयांचे कर्ज वितरितही करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, "एक जिल्हा - एक पीक" या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी टोमॅटो पिकाची निवड करण्यात आली असून, या योजनेतून २२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. टोमॅटो प्रक्रिया उद्योगांसाठी वित्तीय सहाय्य मिळण्याबरोबरच त्यांच्या विस्तारीकरण, बळकटीकरण, ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठीही सरकार मदत करणार आहे. यामध्ये विशेषत: अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि इतर मागासवर्गीयांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण सुविधाही पुरविल्या जातील.
या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप
ही योजना सूक्ष्म आणि लघुउद्योगांच्या विकासासाठी तयार करण्यात आली असून, नव्याने उभारणी होणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगांसोबतच आधीच सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योगांनाही यात मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. पशुखाद्य, दुग्ध उत्पादन, पोल्ट्री आणि मांस प्रक्रिया, बेकरी उत्पादन, डाळ मिल, राइस मिल, मसाले, लोणची, पापड, गूळ प्रक्रिया आणि भाजीपाला प्रक्रियेसारख्या अन्नप्रक्रिया उद्योगांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
ही योजना क्लस्टर पद्धतीवर आणि विशेषतः नाशवंत मालाच्या प्रक्रियेवर आधारित असल्याने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल. पुणे जिल्ह्यात टोमॅटो पिकाखालील क्षेत्र सुमारे ६०३१ हेक्टर असून, यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्याची संधी मिळणार आहे.टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी या योजनेच्या माध्यमातून १ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ६३ लाख रुपये अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?
इच्छुक उद्योजक आणि शेतकऱ्यांनी http://pmfme.mofpi.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीचा लाभ घेऊन, शेतकरी आणि उद्योजक आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकतात. ही योजना केवळ उद्योगांना चालना देण्यास मदत करणार नाही, तर स्थानिक रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.