Sarkari Yojana: शेततळ्यासाठी 75 हजार पर्यंतचे अनुदान! मागेल त्याला शेततळे योजनेत अर्ज कसा कराल?
Sarkari Yojana:- उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून "मागेल त्याला शेततळे" योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होतो. विशेषतः डोंगराळ आणि कोरडवाहू जमिनीत, जिथे विहिरी आणि बोरवेलमधून पाणी मिळणे कठीण असते, अशा ठिकाणी ही योजना उपयुक्त ठरते.
या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
शेतकरी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे किमान 0.6 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. यापूर्वी शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. शेततळे तयार झाल्यानंतर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करणे बंधनकारक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मोजमापानुसारच शेततळे खोदले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी त्याची निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे शेततळे केवळ कृषी विभागाने सांगितलेल्या जागेवरच बनवावे लागते.
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होते?
शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. मात्र, अत्यंत गरीब व गरजू शेतकरी, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे वारस यांना प्राधान्य दिले जाते. लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
शेततळे अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांनी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये आधार कार्ड, सातबारा उतारा आणि आठ-अ उतारा, शेततळ्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे कोटेशन, पंपासाठी अधिकृत कंपनीचा टेस्टिंग रिपोर्ट, अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) असल्यास जात प्रमाणपत्र, हमीपत्र व पूर्व संमती पत्र, लॉटरी जिंकल्यानंतरचा करारनामा, तसेच बँक पासबुक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहेत.
शेततळे खोदण्यासाठी मिळणारे अनुदान:
शेततळ्याचे मोजमाप आणि आकारानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते. यामध्ये –
15 × 15 × 3 मीटरसाठी 28,275 रुपये
20 × 20 × 3 मीटरसाठी 41,218 रुपये
20 × 25 × 3 मीटरसाठी 31,598 रुपये
25 × 25 × 3 मीटरसाठी 49,671रुपये
25 × 25 × 3 मीटर (वैकल्पिक) साठी 58,700 रुपये
30 × 25 × 3 मीटरसाठी 67,728 रुपये
30 × 30 × 3 मीटरसाठी 75,000 रुपये अनुदान दिले जाते.
शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
शेतकरी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून ‘सिंचन, साधने व सुविधा’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर ‘वैयक्तिक शेततळे’ हा पर्याय निवडून, शेततळ्याचा प्रकार (इनलेट व आउटलेट असलेला किंवा नसलेला) निवडावा. शेततळ्याचे मोजमाप आणि स्लोप निवडल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा.
अनुदान मिळण्याची प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे सूचना दिली जाते. त्यानंतर कृषी अधिकारी शेततळ्याची जागा तपासून प्रत्यक्ष पाहणी करतात. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.
ही योजना शेतकऱ्यांसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करण्यासाठी महत्त्वाची असून, शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. राज्यातील कोरडवाहू भागांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी आहे