बाजारांमध्ये सोयाबीनची आवक कमीच; राज्यात Soybean ला काय दर मिळतोय ? वाचा….
Soybean Rate : दरवर्षी विजयादशमीपासून महाराष्ट्रातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक सुरू होत असते. यंदाही विजयादशमीपासून सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. मात्र, बाजारात अजूनही म्हणावी तशी आवक होत नाहीये. विशेष बाब अशी की, मार्केटमध्ये येणाऱ्या मालाला अजूनही अपेक्षित दर मिळत नाहीये.
आवक कमी असतानाही बाजारभाव दबावात असल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे.
सध्या राज्यातील काही बोटावर मोजण्या इतक्याचं बाजारांमध्ये सोयाबीन आवक होत असून तिथेही मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.
दरम्यान आज आपण आठ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात सोयाबीनला काय दर मिळाला या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतोय ?
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 105 क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
या बाजारात आज सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी आज सोयाबीनला किमान 4000, कमाल 4,100 आणि सरासरी चार हजार 100 असा दर मिळाला.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : सोयाबीन साठी विदर्भातील ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या भागातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी येत असतो.
बुलढाणा च्या बाजारात आज 400 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाल्याची नोंद महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
या ठिकाणी मात्र सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. सरासरी बाजार भाव 4000 च्या खालीच राहिलेत. या बाजारात सोयाबीनला किमान 3550, कमाल 4 हजार 50 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.