Shetmal Bajar Bhav: मका,तूर,हरभरा कापूस… कोणत्या पिकाचा बाजारभाव गगनाला भिडला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
Maharashtra Bajar Bhav:- सध्या देशातील बाजारात तुरीच्या दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे हमीभावाच्या तुलनेत दर कमी झाले आहेत. सरकारने तुरीसाठी ७५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी सध्या बाजारात तुरीला सरासरी ६७०० ते ७३०० रुपये दर मिळत आहे. सरकार हमीभावाने खरेदी करत असल्याने बाजाराला काहीसा आधार मिळत आहे. मात्र, पुढील दीड-दोन महिन्यांत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता असल्याने दरपातळी हमीभावाच्या आसपासच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरभऱ्याच्या दरात घसरण
हरभऱ्याच्या बाजारभावातही घट झाली आहे. याला दोन प्रमुख कारणे आहेत – एक म्हणजे, देशात हरभऱ्याच्या नवीन उत्पादनाची आवक सुरू झाली आहे आणि दुसरे म्हणजे पिवळ्या वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढल्याने दर कमी झाले आहेत. सध्या हरभऱ्याला बाजारात ५२०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. पुढील काही आठवडे आवक वाढण्याची शक्यता असल्याने हरभऱ्याचे दर दबावातच राहतील, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
मक्याचा दर स्थिर
मक्याच्या बाजारात मात्र मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्यामुळे दर स्थिर आहेत. देशात मक्याचा मोठा साठा उपलब्ध आहे आणि यंदा मक्याच्या लागवडीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पुरवठ्याचा फारसा ताण जाणवत नाही. दुसरीकडे, एथेनॉल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून मक्याला मोठी मागणी असल्यामुळे दर काहीसे स्थिर राहिले आहेत. सध्या मक्याला २१०० ते २३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, बाजारातील काही अभ्यासकांच्या मते, पुढील दोन-तीन आठवडे मक्याच्या दरात किंचित चढ-उतार राहू शकतो.
सोयाबीन बाजारभावात नरमाई
सोयाबीनच्या बाजारभावातही घट झालेली दिसत आहे. देशातील प्रक्रिया उद्योगांनी खरेदीचे दर कमी केल्यामुळे बाजार समित्यांमध्येही सोयाबीनचे दर घसरले आहेत. सध्या प्रक्रिया प्लांट्स सोयाबीनला ४२५० ते ४३०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत, तर बाजार समित्यांमध्ये हा दर ३७०० ते ४००० रुपयांच्या दरम्यान आहे. याशिवाय, नाफेडच्या सोयाबीन विक्रीचीही चर्चा सुरू झाल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे सोयाबीनच्या दरात चढ-उतार दिसून येण्याची शक्यता आहे.
कापसाच्या दरात किंचित सुधारणा
गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात स्थिरता आली असून किंचित सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात देशभरात सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक झाली. सध्या कापसाला सरासरी ७००० ते ७३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त बाजार बंद होते, त्यामुळे आज काही प्रमाणात व्यापार मंदावला. मात्र, देशातील एकूण आवक कमी होत असल्याने दराला आधार मिळत आहे. अभ्यासकांच्या मते, मार्च महिन्यात कापसाची आवक आणखी घटेल, ज्यामुळे दरात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.