Sarkari Yojana: बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी! महिन्याला 5 हजार रुपये फुकट मिळवा… सरकारने सुरू केली भन्नाट योजना
Scheme For Unemployed Youth:- देशातील बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 (PM Internship Scheme 2025) सुरू केली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशभरातील 738 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 300 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांद्वारे 1,19,000 हून अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही संधी बेरोजगार तरुणांना व्यावसायिक अनुभव मिळवून देण्यासोबतच दरमहा आर्थिक आधारही प्रदान करणार आहे.
कसे आहे या योजनेचे स्वरूप?
ही योजना 21 ते 24 वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी खुली आहे. इच्छुक उमेदवार 12 मार्च 2025 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत. अर्जदार पूर्णवेळ नोकरीत नसावा किंवा कोणत्याही पूर्णवेळ शिक्षणक्रमात सहभागी नसावा. तसेच, अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्यांमध्ये अर्जदार, त्याचे पालक, तसेच पती किंवा पत्नी यांचा समावेश होतो.
या ठिकाणी करावा अर्ज
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://pminternship.mca.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. विशेष म्हणजे, अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, त्यामुळे कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल. उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या जिल्हा, राज्य आणि क्षेत्रानुसार कमाल तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. जर एका कंपनीची ऑफर पसंत नसेल, तर अर्जदार दुसऱ्या किंवा तिसऱ्या इंटर्नशिपसाठी निवड करू शकतो.
या क्षेत्रांमध्ये करता येईल इंटर्नशीप
या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. गॅस, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रवास, ऑटोमोटिव्ह, धातू आणि खाण, उत्पादन, FMCG, RIL, HDFC बँक, ONGC, आयशर मोटर्स, NTPC, मारुती सुझुकी आणि L&T यांसारख्या नामांकित कंपन्या या योजनेत सहभागी झाल्या आहेत. शिक्षणाच्या पात्रतेनुसारही वेगवेगळ्या संधी आहेत – 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 24,696, ITI धारकांसाठी 23,629, डिप्लोमा धारकांसाठी 18,589, 12वी उत्तीर्णांसाठी 15,142, आणि पदवीधरांसाठी 36,901 इंटर्नशिप उपलब्ध आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना मिळते पाच हजार रुपये मानधन
योजनेअंतर्गत, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाईल. ही इंटर्नशिप एक वर्षासाठी असेल, त्यामुळे तरुणांना एकूण 60,000 रुपये मिळतील. सरकारने या योजनेसाठी 840 कोटी रुपयांची तरतूद केली असून, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमामुळे बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष उद्योगांमध्ये अनुभव मिळेल आणि त्यांचे कौशल्यविकास होऊन भविष्यात स्थिर नोकरी मिळवण्याची संधी निर्माण होईल.
तरुणांना करिअर साठी मिळेल योग्य दिशा
पंतप्रधान इंटर्नशिप योजना हा केवळ एक आर्थिक सहाय्य कार्यक्रम नसून, तो तरुणांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सन 2030 पर्यंत महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक दोन तरुणांपैकी एकाकडे रोजगारक्षम कौशल्ये असणार नाहीत. त्यामुळे, ही योजना तरुणांना तांत्रिक आणि औद्योगिक कौशल्ये शिकवून त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या भविष्यासाठी एक मोठे पाऊल उचला.