PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे थांबले? या योजनेतील ‘ही’ महत्त्वाची माहिती तुम्हाला माहित आहे का?
PM Kisan Yojana:- पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, काही शेतकऱ्यांचे या योजनेचे हप्ते अचानक थांबले आहेत. यामागे विविध कारणे असू शकतात. या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तपासणी सुरू असून, काहींनी नव्याने आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीच्या सातबाराधारक शेतकऱ्यांना पात्र मानले जाते. योजना सुरू करताना आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत अनिवार्य होती.
परंतु अनेक शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे सादर केली नव्हती. तलाठी आणि कोतवालांनी वारंवार सूचना दिल्या तरी काही शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिली नव्हती. राज्य शासनाने या योजनेसाठी देखील प्रति वर्ष ६,००० रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा यासाठी उशिरा का होईना, शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे दिली. मात्र, महसूल आणि कृषी खात्याच्या तपासणीत काही शेतकरी अपात्र ठरले आहेत.
शेतकरी अपात्र ठरण्यामागे अनेक कारणे
शेतकरी अपात्र ठरण्यामागे अनेक कारणे आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी नसणे, संविधानिक पदावर लाभ घेत असणे, दुबार नोंदणी करणे, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा निमशासकीय कर्मचारी असणे, जमीन विकल्यामुळे भूमिहीन असणे, माजी संविधानिक पदावरील व्यक्ती असणे, घरातील अन्य सदस्याला आधीच लाभ मिळत असणे, संस्था मालकीची जमीन असणे किंवा १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी करणे, हे महत्त्वाचे कारणे आहेत.
याशिवाय, जमीन स्वतःच्या नावे नसल्यास किंवा ती शेतीशिवाय अन्य कारणांसाठी वापरली जात असल्यासही शेतकरी अपात्र ठरतात. अनिवासी भारतीय (NRI), नोंदणीकृत व्यावसायिक, सेवानिवृत्त कर्मचारी, आयकर भरणारे किंवा ज्यांची ओळख पटत नाही, अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच, खोटी माहिती सादर केल्यास किंवा शासनाच्या निकषात बसत नसल्यासही शेतकरी अपात्र ठरतात.
सध्या अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तपासणी सुरू असून, काहींनी नव्याने आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. कृषी आयुक्त कार्यालयाकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र किंवा अपात्र असल्याचे स्पष्ट केले जाईल. गावपातळीवर अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी सहाय्यकांकडे पाठवण्यात आली आहे. कृषी सहाय्यक तपासणी करून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव पुन्हा सादर करणार आहेत. जे शेतकरी चुकीच्या कारणांमुळे अपात्र ठरले आहेत त्यांनी योग्य कागदपत्रांसह आपला अर्ज फेरसादर करावा.
अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे?
शेतकऱ्यांनी आपल्या योजनेसंबंधी माहिती पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (https://pmkisan.gov.in) तपासावी. जर आपला हप्ता थांबला असेल आणि आपण योजनेसाठी पात्र असल्याचे वाटत असेल, तर त्वरित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. शासनाच्या निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योग्य माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यास थांबलेले हप्ते मिळू शकतात