गव्हाच्या भावात आहे तेजी! येणाऱ्या काळात आवक वाढल्यानंतर गव्हाचे भाव टिकतील की होईल घसरण?
Wheat Market Price:- महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये रब्बी हंगामामध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते. देशामध्ये जर आतापर्यंत जवळपास गव्हाची पेरणी पाहिली तर ती 320 लाख हेक्टरच्या आसपास आहे आणि मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी गहू पेरणीचे प्रमाण जास्त आहे.
यामागील प्रमुख कारण जर बघितले तर जेव्हा गहू पेरणीचा कालावधी होता तेव्हा गव्हाचे भाव तेजीत होते व त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी गहू पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच गहू पेरणीसाठी यावर्षीचे हवामान देखील पोषक होते.
या सगळ्या कारणांमुळे गव्हाची लागवड वाढली व सरकारने देखील विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिला आहे. सध्या जर आपण देशातील बाजारपेठेचा अभ्यास केला तर गव्हाची आवक कमी असून भावात तेजी दिसून येत आहे. बाजार समितीमध्ये सरासरी 2600 रुपये ते 3000 रुपये क्विंटलच्या दरम्यान गव्हाचे दर आहेत.
यावर्षी गव्हासाठी सरकारने जाहीर केला आहे 2425 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव
केंद्र सरकारने यावर्षी गव्हाकरिता 2425 रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे व भारतीय अन्न महामंडळ रेशनवर आणि खुल्या बाजारामध्ये गव्हाची खरेदी करते.
परंतु सरकारने यावर्षी हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट तीनशे लाख टन इतकेच ठेवले आहे. यावर्षी विक्रमी उत्पादनाचा अंदाज सरकारने दिला आहे.परंतु त्यानुसार खरेदी जास्त होईल अशी एक अपेक्षा असताना मात्र सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट कमी ठेवले आहे.
2024-25 च्या हंगामात सरकारने 320 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते व सरकारला प्रत्यक्षात मात्र 266 लाख टन गहू खरेदी करता आला होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या सरकारकडे 182 लाख टन गव्हाचा स्टॉक आहे. मागच्या हंगामामध्ये याच काळात 206 लाख टन स्टॉक होता.
त्यानुसार आपल्याला दिसून येते की, सरकारला गव्हाची खरेदी जास्त प्रमाणात करावी लागेल. तसेच बाजारातील स्थिती देखील त्या पद्धतीची नाही. या सगळ्या कारणांमुळे नवीन गहू बाजारात आला तरी देखील मागणी चांगली राहण्याचा अंदाज असून मागणीचा आधार गहूच्या दरांना मिळू शकतो.
त्यामुळे गव्हाची आवक जरी वाढली तरी देखील गव्हाचे दर हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतील. परंतु हमीभावापेक्षा जास्त प्रमाणात कमी होतील अशी मुळीच शक्यता दिसून येत नाही. तसेच गव्हाचे दर मार्च आणि एप्रिल महिन्यात हमीभावाच्या आसपास राहतील असा अंदाज असून त्यानंतर आवक जर कमी झाली तर आणखी दराला आधार मिळेल असा अंदाज या क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.