संक्रांतीनंतर कपाशीचे भाववाढ होण्याची अपेक्षा ठरली फोल! भाव वाढतील की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत
Cotton Market Price:- कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पिके असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर प्रामुख्याने अवलंबून असते. परंतु जर आपण सध्या दोन्ही पिकांच्या बाबतीतली बाजारभावाची स्थिती बघितली तर ती शेतकऱ्यांना मारक असून या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निर्णय देखील कठीण आहे.
अगदी हीच परिस्थिती कापसाच्या बाबतीत देखील दिसून येत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मकर संक्रांतीनंतर कापसाचे दर वाढतील अशी एक अपेक्षा असते.
कारण मकर संक्रांतीनंतर कापसाच्या निर्यातीचे सौदे सुरू होत असतात. परंतु यावर्षी ही देखील शक्यता मावळली असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट कोसळले आहे.
कापसाची दरवाढ होईल का?
सध्या जर आपण बाजारपेठेची स्थिती बघितली तर सध्या दरवाढीचे कुठल्याही प्रकारचे संकेत तरी दिसून येत नाहीत अशा प्रकारची शक्यता कापुस बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या कापसाची निर्यात जर वाढली तरच कापसाचे दर वाढतील असा जाणकारांनी अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच स्थानिक बाजारात देखील कापसाला हवी तशी मागणी नसल्यामुळे दरवाढीची सध्या कुठलीही शक्यता नाही. जर स्थानिक बाजारामध्ये कापसाला मागणी वाढली तरच कापसाचे भाव वाढू शकतात अशी एक शक्यता आहे. मकर संक्रांतीनंतर कापसाच्या निर्यातीचे सौदे सुरू होतात व त्यामुळे संक्रांत झाल्यानंतर कपाशीचे दर वाढतील अशी एक शक्यता दरवर्षी असते.
परंतु यावर्षी उलट परिस्थिती असून कापसाच्या निर्यातीलाच उठाव नसल्यामुळे संक्रांत झाल्यानंतर देखील कापसाला फारशी मागणी नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांवर संक्रांत कायम असल्याचे सध्याचे चित्र आहे. यावर्षी जर आपण पूर्ण हंगामाची सुरुवात बघितली तर यामध्ये कापसाचे दर साडेसहा हजार ते सात हजार पाचशे रुपये दरम्यान राहिलेले आहेत.
7500 चा दर अगदी सुरुवातीला काही ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला होता व विशेष म्हणजे कापसाला सरकारने 7500 हमीभाव देखील जाहीर केलेला आहे. परंतु हा भाव प्रत्यक्षात सीसीआयचे केंद्रावर देखील मिळाला नसल्याची परिस्थिती आहे.
सध्या काय आहे कापुस बाजारभावाची स्थिती?
सध्या जर आपण खाजगी बाजारातील कापसाला मिळणारा दर पाहिला तर तो 6500 ते 7000 रुपयांपर्यंत आहे. तसेच काही ठिकाणी मात्र 6500 पेक्षा देखील दर कमी आहेत.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारत दरवर्षी 30 ते 35 लाख गाठी निर्यात करतो. परंतु यावर्षी मात्र फक्त पंधरा लाख गाठीचे निर्यात होऊ शकलेली आहे. राष्ट्रीय बाजारामध्ये भारताच्या कापसाचे दर 54 हजार गाठी प्रमाणे मिळताना दिसून येत आहेत.
परंतु त्या तुलनेत मात्र इतर कापूस निर्यातदार देशांच्या कापसाच्या गाठीचे दर 50 हजार रुपये असल्याने भारताच्या कापसाच्या गाठींपेक्षा आयात करणारे देश दुसऱ्या देशांच्या मालाला पसंती देताना दिसून येत आहेत व त्यामुळे उठाव कमी असल्याने देखील दर कमी असल्याचे बोलले जात आहे.