Pune Ring रोडला मोठा बूस्ट! रिंग रोडला मिळणार 15 इंटरचेंज, ट्रॅफिक कोंडीचा होणार कायमचा बंदोबस्त
Pune Ring Road:- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि शहराच्या दळणवळणाला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित रिंग रोडला १५ इंटरचेंज जोडण्याची योजना आखली असून, यासाठी एकूण १४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक सुरळीत होणार असून, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा पीएमआरडीएने केला आहे.
पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या ९ तालुके आणि ६९७ गावांसाठी हा रिंग रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय, पुणे-सातारा आणि पुणे-नगर महामार्गांपासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी स्वतंत्र रस्त्यांचीही तरतूद करण्यात आली आहे.
कुठे होणार इंटरचेंज?
या योजनेंतर्गत चांदखेड ते कासारसाई, मूठा टॉप ते उरावडे आणि निघोजे ते मोई या भागांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. मूठा टॉप ते उरावडे हा ३.५ किमी रस्ता विकसित करण्यासाठी १९.२५ कोटी, चांदखेड ते कासारसाई हा ५ किमी रस्ता तयार करण्यासाठी ५० कोटी, तर निघोजे ते मोई हा ३.६ किमीचा रस्ता तयार करण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे रिंग रोडच्या संपूर्ण मार्गिकेवर वाहतूक गतिमान होणार आहे.
एकूण १५ इंटरचेंजमध्ये १२ आधीच अस्तित्वात आहेत, तर उर्वरित ३ नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. हे नवीन इंटरचेंज तयार करण्यासाठी एकूण १२.१० किलोमीटर लांबीचे रस्ते रिंग रोडशी जोडले जाणार आहेत. यामुळे महामार्गांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.
१.२६ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या एकूण २,५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी तब्बल १.२६ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात पुरंदर विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपी बससेवेचे नवे मार्ग, रेल्वे जोडमार्ग आणि बस टर्मिनल्स तयार करण्याचा समावेश आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा फायदा होईल आणि भविष्यातील वाहतूक गरजांसाठी शहर अधिक सक्षम बनेल. रिंग रोड आणि इंटरचेंज प्रकल्पांचा वेग वाढल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.