भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पी एम किसान चा लाभ मिळणार की नाही ? कृषी राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
Pm Kisan Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. पण, हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
म्हणजे एका वर्षात या योजनेचे दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो यानुसार फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.
अशातच, सरकारने या योजने संदर्भात मोठी माहिती दिली आहे. खरेतर ही योजना फक्त शेतकरी कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे या योजनेचा भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही.
परंतु भविष्यात भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याबाबत सरकार काही विचार करत आहे का या संदर्भात राज्यसभेमध्ये शासनाला प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सरकारच्या योजनेबाबत मोठी माहिती दिली.
कृषी राज्यमंत्री ठाकूर यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने PM-किसान योजनेअंतर्गत ताज्या 18 व्या हप्त्यात 9.58 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 20,657 कोटी रुपये वितरित केले आहेत.
ऑगस्ट-नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी पीएम-किसानच्या 18 व्या हप्त्याअंतर्गत 9,58,97,635 शेतकऱ्यांना 20,657.36 कोटी रुपये मिळाले आहेत.
तसेच एका दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सध्या या योजनेचा लाभ भागधारक शेतकऱ्यांना म्हणजेच वाटेकरी शेतकऱ्यांना अर्थातच भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती कृषी राज्यमंत्री महोदयांनी दिली आहे.
दरम्यान पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता जर शेतकऱ्यांना हवा असेल तर त्यांनी केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.