काहीही केलं तरी 'या' शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही ! यादीत तुमचा तर समावेश नाही ना ? पहा.....
Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी अन सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने देखील देशातील नागरिकांसाठी असंख्य योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी हितासाठी ही मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत.
दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले असून ऑक्टोबर महिन्यात हा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
दरम्यान या योजनेचा पुढील 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशीही माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. खरे तर ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला गेला आहे. मात्र आजही या योजनेच्या नियमांबाबत आणि अटींबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते.
या योजनेच्या नियमांची अजूनही शेतकऱ्यांना माहिती नसल्याची वास्तविकता आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या योजनेचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही याबाबत सरकारने कोणते नियम तयार केले आहेत याचबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा लाभ
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थात्मक जमिनीचे मालक असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
तसेच जे शेतकरी बांधव दुसऱ्याच्या शेत जमिनी कसतात त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ फक्त स्वतःच्या नावावर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
एका शेतकरी कुटुंबातील ( म्हणजे पती-पत्नी आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल) फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे.
पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर जमीन असली तरी देखील फक्त एकालाच लाभ मिळणार आहे.
शेतकरी कुटुंबात असणाऱ्या दोन भावांपैकी एकालाच याचा लाभ मिळेल. मात्र जर दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत असतील तर दोघांना लाभ मिळणार आहे.
जे शेतकरी आमदार, खासदार, मंत्री किंवा नगर पालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पदे भूषवित असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
जे शेतकरी आयकर भारतात त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.