म्हातारपणी शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची पेन्शन ! कोणती आहे ही योजना ?
Pm Kisan Mandhan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून येत्या काही वर्षांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. साहजिकच यामध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा राहणार आहे.
दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका निभावणाऱ्या शेती क्षेत्रासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करते आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होतो.
दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने म्हातारपणी शेतकऱ्यांना त्यांचे आयुष्य आनंदात घालवता यावे यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेला पीएम किसान मानधन योजना असे नाव देण्यात आले असून या अंतर्गत शेतकऱ्यांना म्हातारपणी तीन हजार रुपयांची पेन्शन देण्याची तरतूद आहे.
मात्र या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला काही पैसे गुंतवावे लागतात. या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन हवी असेल तर योजनेत सहभाग नोंदवल्यानंतर 55 रुपयांपासून ते दोनशे रुपये प्रति महिना एवढी रक्कम जमा करावी लागते. आता आपण या योजनेची पात्रता आणि स्वरूप नेमके कसे आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
पी एम किसान मानधन योजनेचे स्वरूप
या योजनेत देशातील कोणतेही शेतकरी सहभागी होऊ शकतात. ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होता येते. जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला तर त्याला प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील. जर समजा एखादा शेतकरी वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला तर त्याला दरमहा दोनशे रुपये एवढी गुंतवणूक करावी लागणार आहे.
वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना गुंतवणूक करावी लागणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच पेन्शन सुरू झाल्यास शेतकऱ्यांना एका वर्षात 36 हजार रुपये मिळणार आहेत.
पेन्शन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर…
जर पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे. मृत्यूनंतर फक्त शेतकऱ्याची पत्नीचं 50% पेन्शनसाठी पात्र ठरणार आहे. शेतकऱ्याच्या मुलांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळणार नाही.