PVC आणि HDPE पाईपसाठी 15 हजार रुपये अनुदान मिळवण्याची संधी…लवकरात लवकर ‘या’ कागदपत्रांसह अर्ज करा
Pipeline Anudan:- पाईपलाईन योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत असून, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात दिवसांत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पीव्हीसी तसेच एचडीपी पाईपसाठी अनुदान देण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते, त्यांना आता या योजनेसाठी पात्र ठरल्याचे संदेश मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ पुढील पायऱ्यांसाठी तयारी करावी.
मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे?
महाडीबीटी पोर्टलच्या लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याने अनेक योजना रखडलेल्या होत्या. मात्र, आता हळूहळू योजनांची लॉटरी जाहीर होऊ लागली आहे. त्यात सिंचन विभागाच्या पाईपलाईन योजनेची लॉटरीही जाहीर झाली असून, ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला आहे, त्यांनी पुढील सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. जर वेळेत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर अनुदानाचा लाभ मिळवणे कठीण होऊ शकते.
या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ५० ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अंतर्गत एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी एचडीपी पाईपसाठी ५० रुपये प्रति मीटर तर पीव्हीसी पाईपसाठी ३५ रुपये प्रति मीटर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना जवळपास १५,००० रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळू शकतो.
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मेसेज आला असेल, तर आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि कोटेशन तत्काळ अपलोड करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळेल. पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागेल आणि त्याचे बिल पुन्हा महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल. त्यामुळे वेळेवर योग्य प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.