एका आठवड्यात कांद्याचे बाजारभाव 21 टक्क्यांनी घसरले, शेतकऱ्यांची अडचण वाढली ! सध्या कांद्याला काय दर मिळतोय ? पहा….
Onion Rate Maharashtra : कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरूच असून, काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेल्या कांद्याचे भाव आता गडगडले आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांची चिंता वाढलीय अन अवघ्या काही दिवसाच्या काळात कांद्याचे दर 20 ते 25 टक्क्यांनी घसरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य आहे. अशा परिस्थितीत कांदा बाजार भावात झालेल्या घसरणीचा सर्वाधिक फटका आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनाच बसतोय. राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना आपला खर्च भागवता येईल एवढा सुद्धा भाव मिळत नाहीये.
सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील लाल कांदा विक्रीसाठी आणत आहेत. उन्हाळी हंगामातील कांदा निदान साठवता तर येतो पण हा लाल कांदा तर साठवताही येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना जो दर मिळतोय त्या भावात आपला कांदा विकावा लागत आहे.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अवघ्या आठवडाभरात कांद्याचे भाव 21 टक्क्यांनी घसरले असून ही बाब खूपच चिंतेची बनली आहे. दुसरीकडे बांगलादेश मध्ये कांद्याची लागवड जवळपास 30 टक्क्यांनी वाढल्याचे वृत्तसमोर आले असून यामुळे त्या ठिकाणी उत्पादनात वाढ होईल आणि भारतातून मोठ्या प्रमाणात होणारी निर्यात कमी होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच भारतातून बांगलादेशला होणारी कांदा निर्यात आगामी काळात पुन्हा प्रभावीत होणार आहे. म्हणून भविष्यातही कांद्याचे दर असेच पडलेले पाहायला मिळू शकतात आणि हीच खरी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका आठवड्यात (4 ते 11 जानेवारी 2025) कांद्याची सरासरी किंमत 2258 रुपयांवरून 1791 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरली आहे. म्हणजे अवघ्या एका आठवड्यात बाजारभावात 450 रुपयांची घट आली आहे. पण, या 21 टक्के घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांकडून कांदा निर्यातीसाठी सध्या जे शुल्क आकारले जात आहे ते शुल्क उठवले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या सरकारकडून कांदा निर्यातीसाठी 20% शुल्क आकारले जात आहे. यामुळे सरकार हे शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेते का हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे ठरेल.