तुतीची लागवड करा आणि सरकारकडून 3 लाख 75 हजाराचे अनुदान मिळवा! रेशीम शेतीतून वर्षाला एकरी मिळते अडीच लाखाचे उत्पन्न
Silk Farming:- कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या पायाभूत सोयी सुविधा उभारण्याच्यासाठी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.यामध्ये अनेक अनुदान स्वरूपाच्या योजना राबवून शेतकऱ्यांना शेतीसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या बाबींसाठी आर्थिक पाठबळ देण्यात येते.
तसेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील आता परंपरागत पिके आणि शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक शेतीची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे व त्यासाठी वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीत शेतकरी आता शेती फायदेशीर कशी होईल? या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत.
यामध्ये रेशीम शेती जर आपण बघितली तर ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे व इतकेच नाहीतर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान दिले जाते.
तुती लागवडीसाठी प्रति एकर तीन वर्षाकरिता मिळते 3 लाख 75 हजारांचे अनुदान
सरकारच्या माध्यमातून रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळण्याकरिता महा रेशीम अभियान अर्थात सिल्क समग्र-2 या योजनेच्या माध्यमातून एक एकर नवीन तुती लागवड करण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
इतकेच नाही तर अनुसूचित जाती/ जमातीच्या शेतकऱ्यांसाठी एका एकर नवीन तुती लागवडीकरिता चार लाख 50 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे.
रेशीम शेतीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तब्बल १०१७ शेतकऱ्यांचा एक हजार दोनशे साठ एकरवर सध्या हा प्रकल्प राबवला जात आहे.
2016-17 पासून रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला आहे मनरेगा मध्ये
रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळावे व या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने सन 2016 ते 17 पासून रेशीम शेतीचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगामध्ये केला आहे.
रेशीम शेती ही कमी पाण्यात करता येणे शक्य आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर ऊस पिकाला जितके पाणी लागते त्याच्या केवळ तीस ते पस्तीस टक्के पाण्यामध्ये ही शेती करता येणे शक्य आहे.
रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली तुतीची लागवड जर तुम्ही एकदा केली तर पुढील 12 ते 15 वर्ष तुतीची झाडे टिकतात व नवीन लागवड करण्याची गरज भासत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो.
एका एकरात मिळते अडीच लाखाचे उत्पन्न
रेशीम शेतीपासून मिळणारे उत्पादन जर बघितले तर यामध्ये प्रत्येक तीन महिन्याला एक पीक याप्रमाणे वर्षाला चार पिके मिळतात. जर एका एकरमध्ये तुती लागवड केली तर या एका एकर मधील तुतीचा पाला रेशीम कीटकांच्या दोनशे अंडी पुंजांसाठी वापरून सरासरी 130 ते 140 किलो रेशीम कोषाचे उत्पादन मिळू शकते.
सध्या जर आपण एक किलो रेशीम कोशाचे बाजारपेठेतील सरासरी दर पाहिले तर ते 450 रुपये प्रतिकिलो इतके आहेत. शेतकऱ्यांना एका पिकापासून 58 हजार ते 63 हजार रुपयांचे उत्पन्न यामुळे मिळते. वर्षाला जर चार पिके घेतली तर अडीच लाख रुपयांचे उत्पन्न हे एकर मधून शेतकरी मिळवू शकतात.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत रेशमी विकास प्रकल्पासाठी तीन वर्षाच्या कालावधीत कुशल व अकुशल मजुरी देण्यात येते. हे मजुरीचे स्वरूप जर बघितले तर तुतीची लागवड व जोपासना याकरिता 682 दिवस व त्यासोबत कीटक संगोपन गृहाकरिता 213 दिवस असे मिळून 895 दिवसांची मजुरी देखील मिळते.