Soybean Market: सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कापसाचे दर स्थिर… पुढील काही दिवसात किमतीत होणार मोठा बदल? व्यापाऱ्यांचे महत्त्वाचे भाकीत
Maharashtra Bajarbhav:- सध्या कृषी बाजारात अनेक पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोयाबीनच्या दरांमध्ये किरकोळ वाढ दिसून येत असली, तरी बाजारातील अस्थिरता कायम आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर क्विंटलमागे २० ते ३० रुपयांनी वाढले असून, सध्या ते ३,८०० ते ४,००० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. प्रक्रिया प्लांट्सनीही सोयाबीन खरेदीचे दर वाढवत ४,३०० ते ४,३५० रुपये प्रति क्विंटल केले आहेत. मात्र, सोयाबीनची बाजारातील मर्यादित आवक आणि उत्पादनाच्या अनिश्चिततेमुळे येत्या काळातही दरांत चढ-उतार होत राहण्याची शक्यता आहे.
कापसाचे आजचे दर
कापसाच्या दरात मागील आठवडाभर कोणताही मोठा बदल झालेला नाही. सध्या कापसाचे बाजारभाव ७,००० ते ७,३०० रुपये प्रति क्विंटल याच पातळीवर आहेत. मात्र, बाजारातील कापसाची आवक मात्र हळूहळू घटत आहे. मागील आठवड्यात बाजारात सव्वा लाख गाठींची आवक होती, जी आता एक लाख गाठींपर्यंत खाली आली आहे. यामुळे पुढील काही आठवड्यांत कापसाचे दर स्थिर राहतील, मात्र उत्पादन आणि मागणी यावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
मुगाचे आजचे बाजारभाव
मुगाच्या दरावर सध्या मोठा दबाव आहे. देशात यंदा मुगाचे उत्पादन आणि आयात दोन्ही वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. मागणी चांगली असली तरी मुगाचे दर अद्यापही हमीभावाच्या खालीच राहिले आहेत. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी ६,५०० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. पुढील काही आठवड्यांसाठी मुगाची आवक कायम राहील, त्यामुळे मोठ्या दरवाढीची शक्यता कमी आहे.
मक्याचे आजचे बाजारभाव
मक्याला इथेनॉल उत्पादनासाठी चांगली मागणी असल्याने त्याच्या बाजारभावाला आधार मिळाला आहे. मात्र, यंदा मक्याची रब्बी हंगामातील लागवड वाढली असून, खरिपाचे उत्पादनही चांगले झाले आहे. परिणामी, देशात मक्याचा मोठा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे मक्याचा बाजार सध्या स्थिर आहे. अनेक बाजारपेठांमध्ये मक्याचे दर २,००० ते २,३०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहेत. सध्या बाजारातील आवकही वाढत आहे, त्यामुळे दर काहीसे स्थिर राहतील, असे बाजार अभ्यासकांचे मत आहे.
कांद्याचे आजचे बाजारभाव
कांद्याच्या दरांमध्ये मागील काही दिवसांत चढ-उतार पाहायला मिळाले. मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याच्या दरांना आधार मिळाला आहे. सध्या कांद्याला बाजारात सरासरी २,००० ते २,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, पुढील दोन आठवड्यांनंतर बाजारात खरिपाच्या शेवटच्या टप्प्यातील कांदा तसेच रब्बी हंगामातील कांदा दाखल होण्याची शक्यता आहे. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
एकंदरीत पाहता कृषी बाजारातील विविध घटकांचा विचार करता सोयाबीन आणि कांद्याच्या दरांत किरकोळ चढ-उतार दिसत आहेत, तर कापूस आणि मक्याचे दर तुलनेने स्थिर आहेत. मुगाच्या दरांवर मात्र अजूनही दबाव कायम आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बदलांवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण उत्पादन, साठवणूक आणि मागणी यावरच भविष्यातील दर अवलंबून असतील.