Maharashtra Bajarbhav: हरभरा आणि तुरीचे दर कोसळणार? पुढील दोन महिने महत्त्वाचे
Maharashtra Bajarbhav:- राज्यात आणि देशभरात सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून सरकारने हमीभावाने खरेदीस मान्यता दिली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष खरेदी बहुतांश भागात सुरू झालेली नाही. त्यामुळे बाजारात दबाव जाणवत असून दरही स्थिर आहेत. सध्या तुरीला सरासरी ₹7,000 ते ₹7,300 दर मिळत आहे. पुढील काही आठवड्यांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने तुरीचा बाजार हमीभावाच्या खाली राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
हरभऱ्याचा बाजारभाव
दुसरीकडे, हरभऱ्याच्या बाजारात सध्या स्थिरता आहे. सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिलेली नाही, त्यामुळे हरभऱ्याच्या दरात मोठी सुधारणा दिसून येत नाही. सध्या हरभऱ्याचे दर ₹5,200 ते ₹5,500 च्या दरम्यान आहेत. पुढील दोन महिने आवकेचा दबाव राहणार असल्याने हरभऱ्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
कारल्याचा बाजारभाव
भाजीपाला बाजारात कारल्याला चांगला उठाव मिळत असला तरी वाढलेल्या आवकेमुळे दरात घट झाली आहे. मागील आठवड्यात कारल्याच्या दरात क्विंटलमागे ₹300 ते ₹500 ची घट झाली असून सध्या ते ₹2,500 ते ₹3,000 च्या दरम्यान विकले जात आहे. पुढील काही दिवस कारल्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बाजारात चढ-उतार
सोयाबीनच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार सुरू असले तरी देशांतर्गत बाजारात अजूनही दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दर ₹4,050 ते ₹4,150 दरम्यान ठेवले असले तरी बाजारात प्रत्यक्ष विक्रीचे दर ₹3,700 ते ₹3,800 पर्यंत खाली आले आहेत. काही आठवडे तरी सोयाबीन बाजारावर दबाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
कापसाच्या बाजारभावावर दबाव
कापसाच्या दरातही दबाव कायम असून आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, देशात कापसाच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. सध्या कापसाला ₹6,800 ते ₹7,200 च्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होईल आणि उद्योगांकडून मागणी वाढेल, त्यामुळे दर सुधारण्याची शक्यता आहे. मात्र, कापूस महामंडळ (CCI) कापूस कसा विकतो, यावर बाजाराचा पुढील ट्रेंड अवलंबून असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य संधी पाहून विक्री करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.