Ladki Bahin Yojana: 2 महिन्यांचे पैसे सांगितले… पण खात्यात फक्त 1 हप्ता! लाडक्या बहिणींची फसवणूक
Ladki Bahin Yojana:- महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक मदत मिळाल्याने काही काळासाठी आनंदाचं वातावरण तयार झालं होतं. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीतील विसंगतीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला. सरकारने दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील असे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात फक्त एका महिन्याचा हफ्ता जमा करण्यात आल्याचे महिलांना समजले.
फेब्रुवारी महिन्यात निधी मिळाला नव्हता, त्यामुळे मार्च महिन्यात तो मिळेल अशी अपेक्षा होती. 7 मार्चपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले, मात्र अनेक ठिकाणी महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच आले, जे अपेक्षित 3000 रुपयांच्या तुलनेत निम्मे होते. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली. सरकारकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दोन महिन्यांचे पैसे देण्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात एकाच महिन्याचे हफ्ते जमा झाल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2100 रुपये देण्याच्या घोषणेवरून सरकारचा युटर्न
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 रुपये अनुदान देण्याच्या घोषणेवर स्पष्टीकरण देत, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अशा कोणत्याही निर्णयाची घोषणा केली नसल्याचे सांगितले. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, महायुती सरकारने केलेली आश्वासने निवडणुकीपुरती मर्यादित होती, असा आरोप केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना मोठा गेंमचेंजर ठरली होती, त्यामुळे सरकारने महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळतील असे सांगितले होते.
मात्र, सरकार आता जाहीरनाम्याचा उल्लेख करत ही योजना पाच वर्षांसाठी असून, त्यानुसार निधी वाढवला जाईल असे सांगत आहे. विरोधकांनी सरकारच्या या भूमिकेवर हल्ला चढवत, निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देऊन आता त्यावरून माघार घेतली जात असल्याचा आरोप केला आहे.
किती आहेत या योजनेचे लाभार्थी
लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये 83% विवाहित महिला आहेत, तर अविवाहित महिला 11.8%, विधवा 4.7%, आणि घटस्फोटित, निराधार, तसेच सोडून दिलेल्या महिलांची संख्या 1% पेक्षा कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील महिलांचा सर्वाधिक म्हणजे 29% वाटा आहे, तर 21 ते 29 वयोगटातील 25.5% आणि 40 ते 49 वयोगटातील 23.6% महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
21 ते 39 वयोगटातील महिलांचे प्रमाण सर्वाधिक 78% आहे, तर 50 ते 65 वयोगटातील 22% महिला लाभार्थी आहेत. विरोधकांच्या मते, सरकारने मोठी आश्वासने देऊनही निधी वेळेवर न दिल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. सरकारला या योजनेंतर्गत मदतीचा निधी वेळेवर आणि संपूर्ण प्रमाणात वितरित करावा लागेल, अन्यथा आगामी निवडणुकीत महिलांच्या असंतोषाचा फटका बसण्याची शक्यता आहे.