लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! 1500 मिळणार की 2100 ?
महिला व बालकल्याण विभागाच्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेच्या पुढील टप्प्यासाठी ३,६९० कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, याच निधीतून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दरमहा १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत की येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या बदलांबाबत निर्णय घेतला जाईल.
सध्याचे हप्त्याचे स्वरूप
सध्या महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले जातात. जर अर्थसंकल्पातून बदल झाला, तर त्याचे रूपांतर २१०० रुपये इतक्या महिन्याच्या हप्त्यात होऊ शकते.
खात्यात पैसे कधी जमा होणार?
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, जानेवारी महिन्याच्या शेवटी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट बँक हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) रक्कम जमा होईल.२६ जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. या महिन्यात सरकारने प्रस्तावित केलेल्या निधीस मान्यता मिळाल्याने लाभार्थी महिलांनी आश्वस्त राहावे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना उद्देश
ही योजना ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आली असून राज्यातील सुमारे २ कोटी ४६ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे व स्वावलंबी बनता यावे, हा या योजनेमागील मुख्य हेतू असून निवडणुकीच्या काळात महिलांना महिन्याला २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आता योजना सुधारणेची शक्यता वर्तवली जाते.
नोंदणी व लाभार्थी संख्येत बदल ?
जानेवारी महिन्यात काही महिलांच्या नोंदणीवर आक्षेप घेण्यात आले होते. काही महिला दोन वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळल्यामुळे त्यांची नावे काढण्यात आली, असे तटकरे यांनी स्पष्ट केले असून उर्वरित सर्वच पात्र महिलांना वेळेत हप्ता मिळणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
२१०० रुपये हप्ता सुरू होईल का ?
लाडकी बहीण योजनेतून महिलांना देण्यात येणारी दरमहा रक्कम, त्यातून होणारा आर्थिक आधार व स्वावलंबन ही बाब महत्त्वाची ठरत आहे.निवडणुकीतील आश्वासनांना पूर्तता देताना सरकारकडे हे योजनेचे पुढील टप्पे (मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पाद्वारे) निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.यामुळे महिलांसाठी १५०० रुपये हप्ता बंद करून २१०० रुपये हप्ता सुरू होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.