लाडकी बहीण योजना : डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 चा की 2100 चा ? सीएम फडणवीस म्हणतात…..
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरली. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीच्या आधीच या योजनेचे पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले.
महत्त्वाचे बाब अशी की या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा देखील महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली. महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयात आणखी सहाशे रुपयांची वाढ करू आणि हा निधी 2100 रुपयांपर्यंत करू असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणारा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच महिलांना 2100 रुपये मिळणार का? असा असा प्रश्न विचारला जात असून आता याच संदर्भात राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे.
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी २१०० रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय. पुढील वर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे विरोधकांनी मात्र 2100 देण्याची योजना जानेवारी पासूनच सुरु करण्याची मागणी केलीय. लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली.
त्यानुसार अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला. निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवलंय.
फडणवीस यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाईल असे म्हटले आहे. यामुळे आता या योजनेतून कोणाचे नाव गायब होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे सध्याचे निकष काय आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूयात.
लाडकी बहिण योजनेचे सध्याचे निकष
या योजनेचा लाभ फक्त किमान 21 आणि कमाल 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळतोय. 21 ते 65 वर्ष वयोगटात ज्या महिला येतात त्यांना याचा लाभ मिळतो.
आधीच शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजनांचा म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना याचा लाभ मिळत नाही.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतात.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो. पण ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरतात.
जे लोक निवृत्तीवेतन घेत आहेत, सरकारी कर्मचारी आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
आमदार, खासदार सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही.
एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना याचा लाभ मिळतोय.