Kanda Bajarbhav: कांदा बाजारात उलाढाल वाढली.. अहिल्यानगर कांदा बाजारात विक्रमी आवक! पुढील महिन्यात दर कसे राहणार?
Maharashtra Bajar Bhav:- राज्यात उन्हाळ कांद्याची आवक झपाट्याने वाढत असून, बाजारात दर प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावत आहेत. यंदा समाधानकारक पावसामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यभर रब्बी उन्हाळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या होत्या. आता त्या कांद्याची काढणी वेग घेत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा बाजारात येत असून, नाशिक जिल्ह्यातही फेब्रुवारी अखेरपासून आवक सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामात मागील खरीप उत्पादन अतिवृष्टी आणि मान्सूनोत्तर पावसामुळे प्रभावित झाले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांत कांद्याचे दर सर्वसाधारण राहिले होते. मात्र, जानेवारीनंतर पुरवठ्यात झालेल्या घसरणीमुळे कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ दिसून आली. आता नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली असली तरी ती नेहमीच्या तुलनेत दोन आठवडे उशिराने होत आहे.
राज्यात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषतः आगाप लागवड केलेल्या कांद्याची काढणी सध्या सुरू असून, त्यासाठी साधारण ११० दिवसांचा कालावधी लागतो. सध्या अहिल्यानगर, नाशिक, बीड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येत आहे. मात्र, तुलनात्मकदृष्ट्या आवक अजूनही अपेक्षेपेक्षा थोडी कमी असून, कांद्याची प्रतवारी सरासरी दर्जाची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मार्च अखेरपासून आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक
राज्यातील कांदा बाजारांमध्ये अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे. येथे आठवड्यातून तीन दिवस बंद गोणीमध्ये लिलाव होतात. २७ फेब्रुवारी रोजी येथे ३१,११० क्विंटल, तर १ मार्च रोजी ३०,७९९ क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला, ही राज्यातील सर्वाधिक आवक मानली जात आहे.
त्याचप्रमाणे, २८ फेब्रुवारी रोजी पारनेर बाजार आवारात १०,२११ क्विंटल कांद्याची नोंद झाली असून, त्यास सरासरी २,१२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नामपूर, सटाणा, उमराणे, येवला, नांदगाव, चांदवड आणि नामपूर बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद व बीड जिल्ह्यातील कडा येथेही मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येत आहे.
सध्या बाजारात कांद्याचे दर स्थिर
सध्या बाजारात कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसत असले तरी, आगामी काळात आवक वाढल्यावर दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहिल्यानगर बाजार समितीमध्ये १ मार्च रोजी कांद्याचे किमान दर ५०० रुपये तर कमाल दर २,६०० रुपये प्रतिक्विंटल होते. लासलगाव बाजारात कांद्याचा सरासरी दर २,३०० रुपये होता, तर विंचूर बाजारात २,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोपरगाव बाजारात २,२७५ रुपये, शिरसगाव तिळवणी येथे १,९३० रुपये आणि मनमाड बाजारात सरासरी २,००५ रुपये दर मिळाला. आगामी काळात उन्हाळ कांद्याची अधिकाधिक आवक होणार असल्याने बाजारातील दरांमध्ये आणखी काही बदल होऊ शकतात.