Thibak Sinchan Subsidy: ठिबक सिंचनासाठी सरकारचे 144 कोटींचे अनुदान मंजूर.. कोणाला मिळणार फायदा?
02:31 PM Feb 15, 2025 IST
|
Krushi Marathi
Advertisement
hibak Anudan:- राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना लागू केली आहे. विशेषतः अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये सिंचन सोयीसाठी ही योजना 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली होती.
पुढे, 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील इतर तालुक्यांमध्येही ही योजना विस्तारण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व भागांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आतापर्यंतचा मंजूर निधी
सन 2024-25 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 400 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 300 कोटी सूक्ष्म सिंचनासाठी (ठिबक आणि तुषार सिंचन) तसेच 100 कोटी वैयक्तिक शेततळ्यांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
यासाठी शासनाने 16 मे 2024 रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. कृषी आयुक्तालयाने सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदानाची मागणी केली होती, तसेच प्रलंबित दायित्व लक्षात घेऊन सरकारकडून 144 कोटींच्या निधी वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल लाभ
ही योजना महा-डीबीटी प्रणालीद्वारे कार्यान्वित केली जाणार आहे.म्हणजेच शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान मिळणार आहे.
हे अनुदान सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) द्वारे वितरित करण्यात येणार असून, पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी याला प्राधान्य दिले जाणार आहे. महा-डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. विशेषतः पाण्याची कमतरता असलेल्या भागांतील शेतकऱ्यांना या सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असून, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यास मदत होईल.
Advertisement
Next Article