Gold Price Today: सोन चमकल! आज सोन्याच्या दरात भक्कम उसळी.. चांदी झाली स्वस्त
Gold Price Today:- गुरुवार, १३ मार्च रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५२९ रुपयांनी वाढून ८६,६७२ रुपयांवर पोहोचली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, काल म्हणजेच बुधवारी हा दर ८६,१४३ रुपये होता. विशेष म्हणजे, १९ फेब्रुवारी रोजी सोन्याने ८६,७३३ रुपयांचा उच्चांक गाठला होता. यावर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याचा दर तब्बल १०,५१० रुपयांनी वाढला आहे. २०२४ मध्ये सोन्याच्या किमतीत १२,८१० रुपयांची वाढ झाली होती, त्यामुळे या सततच्या वाढीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चांदीच्या दरात झाली किंचित घसरण
दुसरीकडे, चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आज एक किलो चांदी १५० रुपयांनी स्वस्त झाली असून ९७,९५० रुपये प्रति किलोवर आली आहे. काल ही किंमत ९८,१०० रुपये होती. मात्र, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदीने प्रति किलो ९९,१५१ रुपयांचा उच्चांक गाठला होता. यावर्षीच्या सुरुवातीपासून चांदीच्या दरात ११,९३३ रुपयांची वाढ झाली आहे. या चढ-उतारांमुळे सोन्या-चांदीच्या बाजारावर सतत नजर ठेवणे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे बनले आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
देशातील प्रमुख महानगरांमध्येही सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येते. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८१,३५० रुपये असून २४ कॅरेटसाठी ८८,७३० रुपये आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८१,२०० रुपये तर २४ कॅरेटसाठी ८८,५८० रुपये आहे. ही वाढती किंमत पाहता सोन्यात गुंतवणुकीचा कल वाढताना दिसतोय.
यावर्षी 90 हजार रुपये तोळ्यापर्यंत दर जाण्याची शक्यता
विशेषज्ञांच्या मते, यावर्षी सोन्याचा दर ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, अमेरिकेनंतर युकेने व्याजदरात कपात केल्याने आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोन्याला आधार मिळत आहे. याशिवाय, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढल्यानेही सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोने खरेदी करताना ही काळजी घ्या
सोन्याची खरेदी करताना नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करावे. हॉलमार्कमध्ये ६ अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असतो, जो सोन्याची शुद्धता दर्शवतो. हा कोड अल्फान्यूमेरिक स्वरूपात असतो, उदा. AZ4524. त्यामुळे सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे. सतत वाढणाऱ्या सोन्याच्या किमती लक्षात घेता योग्य माहिती घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.