राज्यातील महिला बचत गटांना ‘या’ योजनेतून 8 लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा! राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Scheme For Women:- महिलांचे सक्षमीकरण ही संकल्पना खूप महत्त्वाची असून या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक पावले उचलण्यात येत असून यामध्ये अनेक योजना महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. जेणेकरून महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक जीवनमानात सुधारणा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.
महिलांना ग्रामीण पातळीवर रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून देखील अनेक योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये जर आपण महिला बचत गटांचा विचार केला तर महिला बचत गटांच्या माध्यमातून देखील महिलांना रोजगार उपलब्ध होतो व याकरिता देखील सरकारच्या अनेक योजना खूप सहाय्यभूत ठरतात.
अशा पद्धतीने महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो ड्रोन दीदी योजना ही देखील केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना 80 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने आता राज्यातील महिला बचत गटांना नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळावा याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय 23 जानेवारी 2025 म्हणजेच गुरुवारी राज्य सरकारने घेतला असून त्यामुळे आता महिला बचत गटांना 80 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध होणार आहे.
नमो ड्रोन दीदी योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नमो ड्रोन दीदी योजना अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या अंमलबजावणी करता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय 23 जानेवारी 2025 रोजी राज्य सरकारने घेतला असून त्यामुळे आता या योजनेतून महिला बचत गटांना 80% अनुदानावर ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये या योजनेची अंमलबजावणी करता यावी याकरिता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून एप्रिल 2024 मध्ये राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. परंतु त्यावर राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीची कार्यवाही केली नव्हती.
परंतु आता राज्य सरकारने समिती स्थापन केल्यामुळे महिला बचत गटांना ड्रोन मिळण्यास मदत होणार आहे. यामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशनच्या माध्यमातून महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला आता कीटकनाशकांच्या फवारणीसाठी हे ड्रोन भाड्याने देऊन या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.
केंद्र सरकारने या योजनेकरिता 1261 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला
नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंतर्गत 2024-2025 ते 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 14,500 महिला बचत गटांना ड्रोन मिळणार आहे. याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 1261 कोटींचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना ड्रोनची खरेदी व इतर आवश्यक साहित्याकरिता 80 टक्के अनुदान किंवा कमाल आठ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
नमो ड्रोन दीदी योजनेतून महिलांना दरवर्षी किमान एक लाख रुपये कमवता येऊ शकतात व त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारू शकेल असा दावा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 2024 मार्च महिन्यात या योजनेतून १००० ड्रोन महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाटप देखील केले आहे.
राज्यस्तरीय समिती करेल लाभार्थी गटांची निवड
राज्य सरकारने आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे व या समितीचे अध्यक्ष राज्याच्या प्रमुख सचिव/ प्रधान सचिव / कृषी विभाग सचिव असणार असून यामध्ये 10 सदस्यांचा समावेश आहे. ही समिती लाभार्थी गटांची निवड करण्यापासून तर ड्रोन पायलट आणि ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड करणे इत्यादी जबाबदारी पार पाडणार आहे.