Farmer Subsidy Scheme: शेतीसाठी पैसा नाही? आता मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान… जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer Scheme:- शेती हा हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळवणे अनेकदा कठीण होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि सिंचनाच्या सुविधा सुधारण्यासाठी सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते. ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी असून त्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत किती मिळते अनुदान?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवी विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. जर शेतकऱ्याकडे आधीच विहीर असेल आणि तिची दुरुस्ती करायची असेल, तर त्यासाठीही 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. याशिवाय, पाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठीही अनुदान दिले जाते. शेततळ्याच्या आकारमानानुसार प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये यातील जे कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांना मिळते. यामुळे पाणी साठवण्याची सुविधा निर्माण होऊन शेतकऱ्यांना कमी पावसाच्या परिस्थितीतही शेती करणे शक्य होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता
0.40 हेक्टर ते 6.00 हेक्टर शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना विशेषतः या योजनेचा मोठा फायदा होतो. छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारले आहे.
अर्ज कुठे कराल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि शेतजमिनीची माहिती अपलोड करावी लागते. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्याची आणि सिंचन सुविधा सुधारण्याची मोठी संधी आहे. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक आणि सुस्थित शेती करू शकतात. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग करून घेतल्यास शेतीतील उत्पादन वाढू शकते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही अधिक स्थिर होऊ शकते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा फायदा घ्यावा.