Dairy Business: 13 लाखांचे कर्ज, 50% अनुदान…स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी!
Dairy Business:- स्वतःची दूध डेअरी उघडण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी सरकारने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत 30 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे.
या योजनेंतर्गत दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी 13 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या अर्जदारांना 4.50 लाख रुपयांपर्यंत अनुदानही मिळणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणताही शेतकरी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, संघटित गट किंवा छोट्या-मोठ्या कंपन्या अर्ज करू शकतात.
कसे आहे या कर्जाचे स्वरूप?
या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना बँकांमार्फत सहकार्य मिळणार आहे. हे कर्ज देण्यासाठी निवडक व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका, कृषी आणि ग्रामीण विकास बँका तसेच नाबार्डकडून पुनर्वित्तासाठी पात्र असलेल्या इतर वित्तीय संस्थांचा समावेश आहे.
डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत, डेअरी फार्म उघडण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया उपकरणांसाठीही अनुदान दिले जाते. या अंतर्गत, जर कोणी 13 लाख रुपयांपर्यंत दूध उत्पादन युनिटसाठी गुंतवणूक करत असेल, तर त्याला 25% म्हणजेच 3.30 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांसाठी ही अनुदानाची रक्कम 4.50 लाख रुपयांपर्यंत आहे.
या कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया
या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. लाभार्थ्यांना कर्जासाठी अर्ज करताना खर्च प्रमाणपत्र सादर करावे लागते. सरकार 50% पर्यंत अनुदान देत असल्याने, उर्वरित रक्कम बँकेकडून मंजूर केली जाते आणि 25% रक्कम अर्जदाराने स्वतः उभी करावी लागते. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कोणत्या प्रकारचा डेअरी फार्म सुरू करणार आहात, याचा निर्णय घ्यावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला नाबार्डच्या स्थानिक कार्यालयात किंवा जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. बँकेत सबसिडी फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह तो सादर करावा लागतो. जर कर्जाची रक्कम जास्त असेल, तर संबंधित व्यक्तीला प्रकल्प अहवाल तयार करून नाबार्डकडे सादर करावा लागतो.
याकरिता लागणारी कागदपत्रे
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती-जमातींसाठी), बँक खात्याचा कॅन्सल चेक, बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट यांचा समावेश आहे. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी इच्छुक व्यक्तींनी नाबार्डच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक 022-26539895/96/99 वर संपर्क साधावा किंवा webmaster@nabard.org या ईमेल आयडीवर मेल पाठवावा. डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, ज्याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे.