पुण्यातील लाडकी बहिणींसाठी वाईट बातमी ! घरोघरी होणार तपासणी...
Pune News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन असल्यास त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. यासाठी आजपासून (दि. 10) बालविकास प्रकल्प अधिकारी, परिवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.
महिला व बालविकास विभागाची तपासणी मोहीम
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी दि. 3 एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये अयोग्य लाभ घेणाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः, कुटुंबाच्या नावावर कार असल्यास त्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.
राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला संबंधित लाभार्थींची यादी दिली आहे. या यादीत 75,100 महिलांच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले. त्यामुळे या सर्व लाभार्थींच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मालकीच्या वाहनाची पडताळणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया सोमवारपासून अधिकृतरित्या सुरू झाली आहे.
घरगुती तपासणी
प्रत्येक जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन सत्यापन करणार. पाहणीनंतर तयार केलेली अंतिम यादी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे अंतिम यादी सुपूर्द करण्यात येईल.यादीतील महिलांच्या कुटुंबात खरोखरच कार असल्याचे आढळल्यास, त्या लाभार्थ्यांचे नाव त्वरित योजनेतून काढले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील अर्जदारांची संख्या मोठी
पुणे जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 991 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 20 लाख 89 हजार 946 महिला पात्र ठरल्या. शासनाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला वर्गवारीनुसार यादी पाठवण्यात आली असून, त्यात 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वेच्छेने लाभ सोडण्याचे आवाहन अपयशी
राज्य सरकारने महिलांना स्वेच्छेने लाभ सोडावा असे आवाहन केले होते. मात्र, फारच कमी महिलांनी याला प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक ठरले.शासनाने वाहतूक विभागाच्या मदतीने जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांच्या मालकीच्या वाहनांची यादी तयार केली आणि ती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.
विभक्त राहणाऱ्या महिलांना दिलासा
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, जर लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असेल आणि सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर कार असेल, तर त्यांचा लाभ बंद होणार नाही. यामुळे विभक्त राहणाऱ्या महिलांना योजना सुरूच राहणार आहे.
लाभ सोडण्यासाठी प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडू इच्छिणाऱ्या महिलांसाठी शासनाने वेगळी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.
➡ तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करता येईल.
➡ https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "तक्रार निवारण" पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज करता येईल.
शासनाच्या कारवाईकडे लक्ष
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या धोरणामुळे पात्र लाभार्थींनाच मदत मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, काही कुटुंबांसाठी हा निर्णय अडचणीचा ठरू शकतो. यासंदर्भात पुढील काही दिवसांत अधिक माहिती स्पष्ट होईल