Agriculture Commodity Market: कापूस, हरभरा, मका झाला स्वस्त! शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?
Agriculture Commodity Market:- कृषी कमोडिटी मार्केटमध्ये १ ते ७ मार्च २०२५ या आठवड्यात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. १ मार्चपासून NCDEX मध्ये एप्रिल २०२६ डिलीवरीसाठी कपाशीचे आणि जुलै २०२५ डिलीवरीसाठी मक्याचे व्यवहार सुरू झाले. तसेच, MCX मध्ये सप्टेंबर २०२५ डिलीवरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू झाले. त्यामुळे मार्चमध्ये NCDEX मध्ये कपाशीचे एप्रिल २०२५, नोव्हेंबर २०२५, फेब्रुवारी २०२६ आणि एप्रिल २०२६ डिलीवरीसाठी तसेच मक्याचे मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै २०२५ डिलीवरीसाठी व्यवहार सुरू झाले.
हळदीचे एप्रिल, मे, जून आणि ऑगस्ट २०२५ डिलीवरीसाठी व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसाचे मार्च, मे, जुलै आणि सप्टेंबर २०२५ डिलीवरीसाठी व्यवहार सुरू आहेत. सोयाबीन व कापूस यांच्या आंतरराष्ट्रीय किमती याआधीच घसरत होत्या.त्यात अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे त्यात अधिक घट झाली. २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ दरम्यान अमेरिकेतील सोयाबीनच्या किमती ३.८ टक्क्यांनी तर कापसाच्या किमती ३ टक्क्यांनी घसरल्या.
देशातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक
देशातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात हरभऱ्याची एकूण आवक ८,६०० टन होती, जी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात वाढून ९९,४०० टन झाली. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ४८ टक्के आहे, त्याखालोखाल गुजरात (१७ टक्के), मध्य प्रदेश (१७ टक्के) आणि कर्नाटक (११ टक्के) या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रातील हिंगणघाट, अमरावती, जालना, अंमळनेर आणि अकोला या बाजार समित्या प्रमुख आहेत.
सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या किमती घसरल्या
या आठवड्यात सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या किमती घसरल्या. सोयाबीनच्या किमती ०.६ टक्क्यांनी वाढल्या, तर हरभऱ्याच्या किमती हमीभावाइतक्या आल्या आहेत. वाढत्या आवकेमुळे पुढील काही दिवसांत त्या आणखी घसरण्याची शक्यता आहे. MCX मध्ये कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) ०.६ टक्क्यांनी घसरून रु. ५३,०८० वर आले असून मे फ्यूचर्स भाव १.५ टक्क्यांनी घसरून रु. ५४,००० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ५६,००० वर असून ते स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्के अधिक आहेत. NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) ०.१ टक्क्यांनी घसरून रु. १,४०२ वर आले आहेत, तर नोव्हेंबर फ्यूचर्स ५.२ टक्के वाढून रु. १,४७६ वर पोहोचले आहेत.
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या आठवड्यात रु. २,३०० वर आल्या असून एप्रिल फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्यांनी घसरून रु. २,३१९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,३४७ वर असून स्पॉटपेक्षा २ टक्के अधिक आहेत. सध्याच्या स्पॉट आणि फ्यूचर्स किमती हमीभाव (रु. २,२२५) पेक्षा अधिक आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) ३.५ टक्क्यांनी घसरून रु. १२,४०० वर आल्या असून एप्रिल फ्यूचर्स ५.५ टक्के घसरून रु. ११,७६८ वर आल्या आहेत.
हरभऱ्याच्या स्पॉट किमती
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या आठवड्यात १.३ टक्क्यांनी घसरून रु. ५,८०० वर आल्या होत्या, तर या आठवड्यात त्या २.६ टक्के घसरून रु. ५,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे आणि आवक वाढती आहे. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,९०० वर पोहोचली असून मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीनची स्पॉट किंमत
गेल्या आठवड्यात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.६ टक्के घसरून रु. ४,१९२ वर आली होती, परंतु या आठवड्यात ती ०.६ टक्के वाढून रु. ४,२१७ वर पोहोचली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली असून हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. तुरीच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या आठवड्यात ०.४ टक्के वाढून रु. ७,६४६ वर पोहोचल्या होत्या, परंतु या आठवड्यात त्या ०.१ टक्के घसरून रु. ७,६३७ वर आल्या आहेत. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे आणि आवक कमी होऊ लागली आहे.
कांद्याच्या (पिंपळगाव बसवंत) किमती या आठवड्यात ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २,१३५ वर आल्या असून कांद्याची आवक टिकून आहे. रब्बी कांद्याची आवक एप्रिलपासून सुरू होईल. टोमॅटोच्या स्पॉट किमती (जुन्नर, नारायणगाव) गेल्या आठवड्यात रु. ९३८ होत्या, तर या आठवड्यात त्या वाढून रु. १,००० वर आल्या आहेत.