Womens Day Special: संसार उध्वस्त झाला, पण आत्मविश्वासाने नव्याने सुरुवात! वाचा एका महिलेच्या संघर्षाची सत्यकथा
Womens Day Special:- सुनिता लिल्हारे यांची कहाणी केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची नाही, तर आत्मनिर्भरतेचा, जिद्दीचा आणि मातृत्वाच्या शक्तीचा एक जिवंत प्रत्यय आहे. सालेकसा तालुक्यातील पाथरी गावातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुनिता यांना शिक्षणाची आवड होती. ती अभ्यासात हुशार असल्याने शिक्षकांनीही तिला पुढे शिकण्यास प्रोत्साहन दिले.
बारावीच्या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस होता. पण गावातील पारंपरिक विचारसरणीनुसार कुटुंबीयांनी तिला पुढील शिक्षण न देता तिचे लग्न लावून दिले. नवेगाव येथील गणेश दमाहे या युवकासोबत तिचा विवाह झाला. गणेशने त्यांच्या शिक्षणाच्या इच्छेला पाठिंबा दिला आणि ती बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेऊन शिक्षण सुरू ठेवू लागली.
संसार व्यवस्थित सुरू असताना अचानक काळाचा घाला
संसार व्यवस्थित सुरू असतानाच सुनिता या गरोदर राहिल्या.काही महिन्यांतच त्या एका चिमुकल्याची आई झाल्या.मात्र, नियतीने तिच्यासाठी काही वेगळेच लिहिले होते. मुलगा अवघा सहा महिन्यांचा असताना एका क्षुल्लक कारणावरून तिच्या पतीची निर्घृण हत्या झाली. नवरा गमावल्याचा मोठा धक्का तिला बसला. घरात कमावणारा कोणीही उरला नव्हता. सासरे जिवंत होते, पण ते देखील या घटनेमुळे मानसिकरीत्या खचले. काही दिवसांतच त्यांनीही जगाचा निरोप घेतला. एकीकडे पतीचा मृत्यू, दुसरीकडे सासऱ्यांचे निधन, तिसरीकडे लहानग्या मुलाची जबाबदारी—सुनिता यांच्या आयुष्याला एक कठीण कलाटणी मिळाली.
पतीच्या मृत्यूनंतर सुरू झाला जीवनाचा संघर्ष
पतीच्या मृत्यूनंतर ती पूर्णतः एकटी पडली होती. कुठे जायचे, कसे जगायचे, पुढे काय करायचे याबाबत तिला काहीच सुचत नव्हते. वडील तिला धीर देत होते, पण आर्थिक पाठबळ नसल्याने परिस्थिती अधिकच कठीण बनली होती. शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवायची तिची इच्छा होती, पण त्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक होते. सहा महिन्याच्या चिमुकल्याला सोडून कुठेही जाणे तिला शक्य नव्हते. शेवटी परिस्थितीसमोर झुकण्याऐवजी तिने परिस्थितीशी लढण्याचा निर्धार केला.
तिने घरी राहूनच पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमएससीआयटीचे प्रशिक्षण घेतले. पण तरीही आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी नोकरी करणे आवश्यक होते. मात्र, लहान मुलाला एकटे सोडून ती नोकरी करू शकत नव्हती. अशा स्थितीत तिने आपल्या मालकीच्या तीन एकर शेतीकडे लक्ष द्यायचे ठरवले. शेतीत फारसे अनुभव नसतानाही तिने शिकत शिकत शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या—कधी हवामानाने दगा दिला, कधी आर्थिक संकटे उभी राहिली, कधी उत्पादन कमी झाले. मात्र, कुठल्याही परिस्थितीत तिने हार मानली नाही.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञान ठरले फायद्याचे
तिने आधुनिक शेती तंत्रज्ञान समजून घेतले, शेतीसाठी आवश्यक सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने मेहनत करत राहिली. काही वर्षांतच तिच्या मेहनतीचे फळ दिसू लागले. तिने आपल्या शेतात भाजीपाला, धान्य, कडधान्य आणि काही ठिकाणी फळझाडेही लावली. हळूहळू उत्पादन वाढू लागले आणि तिचे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. तिने पारंपरिक शेतीच्या जोडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत जलसंधारण, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेती यासारखे प्रयोग सुरू केले. आज तिच्या शेतातून चांगले उत्पादन मिळते आणि त्यामुळे तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालतो.
सुनिता यांचा मुलगा आता चौदा वर्षांचा आहे. तिने दिवसरात्र मेहनत करून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. ज्या स्वप्नांसाठी तिला लढावे लागले, तीच स्वप्ने आता ती मुलाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी झटत आहे. शिक्षणासाठी ती त्याला उत्तम संधी देत आहे, जेणेकरून भविष्यात त्याला स्वतःच्या पायांवर उभे राहता येईल. तिची कहाणी हा केवळ संघर्ष नाही, तर आत्मनिर्भरतेचा, कष्टाचा आणि धैर्याचा एक उत्तम आदर्श आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने सुनितासारख्या अनेक महिलांना सलाम, ज्या परिस्थितीशी हार न मानता स्वतःच्या हिंमतीने आयुष्य उभारतात. सुनिताने यांनी सिद्ध केले की, संकटे कितीही मोठी असली तरीही जिद्द, परिश्रम आणि आशावाद यांच्या जोरावर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते.