गव्हाच्या 'या' सुधारित जातींची पेरणी केल्यास मिळणार अधिकचे उत्पादन ! वाचा सविस्तर
Wheat Farming : सध्या संपूर्ण देशभर दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात मोठे प्रसन्न वातावरण आहे. देशात दीपोत्सवाचा सण सुरू असला तरी देखील शेतकरी बांधव शेती कामांमध्ये मग्न आहेत. सध्या देशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू आहे.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची पेरणी सुरू असल्याने आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत.
यामुळे जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गव्हाची बागायती भागात वेळेवर पेरणी करायची असल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात करावी.
तसेच बागायती भागात उशिराने पेरणी करण्याचा कालावधी हा 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा आहे. मात्र 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करणे टाळावे. कारण की यानंतर गहू पेरणी केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती असते.
तसेच गव्हाची पेरणी करताना सुधारित जातींची निवड करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना जिरायती भागात गव्हाची पेरणी करायची असेल त्यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यातच पेरणी करणे आवश्यक आहे.
तथापि यंदा मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असल्याने जिरायती भागातही एक दोन आठवडा उशिराने पेरणी केली जाऊ शकते. पण, जिराईत पेरणीसाठी NIDW-15 (पंचवटी) व शरद या जातींची निवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळेल.
तसेच, जिराईत पेरणीसाठी हेक्टरी ८० ते १०० किलो बियाणे वापरावे. जे शेतकरी बांधव बागायती भागात वेळेवर गहू पेरणी करू इच्छित असतील त्यांनी MACS-6222, NIAW-301 (त्र्यंबक), NIAW-917 (तपोवन) व NIAW-295 (गोदावरी) या जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी करण्यासाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे पुरेसे ठरते.
बागायती भागात अन उशिरा पेरणीसाठी AKAW-4627 व NIAW-34 या जातींची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले समाधान हे असे वाण आहे जे वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी उपयुक्त आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमी उपलब्धता आहे त्यांनी NIAW-1415 (नेत्रावती) व HD-2187 (पुसा बहार) या जातींची निवड करावी असाही सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे.