गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उच्च तापमानात तग धरणाऱ्या गव्हाच्या नवीन जाती विकसित, वाचा सविस्तर
Wheat Farming : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गव्हाच्या दोन नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) गहू, धान आणि तेलबियांच्या आठ नवीन उच्च-उत्पादक, हवामानास अनुकूल वाण सादर केले आहेत.
यामध्ये गव्हाच्या दोन जातींचा समावेश आहे. यासंदर्भात भाभा अनुसंशोधन केंद्राने एक परिपत्रक काढले होते ज्यात रेडिएशन-आधारित उत्परिवर्तन प्रजनन तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या, या नॉन-जीएमओ पीक जाती संपूर्ण भारतातील शेतीमध्ये "क्रांती" करण्यासाठी सज्ज आहेत, असे म्हटले गेले आहे.
विशेष बाब अशी की या संस्थेने पहिल्यांदाच गव्हाच्या जाती विकसित केलेल्या आहेत. दरम्यान आज आपण या संस्थेने विकसित केलेल्या गव्हाच्या या दोन्ही जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती.
गव्हाच्या नव्याने विकसित झालेल्या जातींच्या विशेषता
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या संशोधन केंद्राने ट्रॉम्बे जोधपूर गहू-153 (TJW-153) आणि ट्रॉम्बे राज विजय गहू-155 (TRVW-155) या गव्हाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. यातील ट्रॉम्बे जोधपूर गहू-153 (TJW-153) ही जात राजस्थानमधील जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.
TJW-153 उष्णता-सहिष्णु आहे. ही जात लवकर किंवा टर्मिनल उष्णतेचा ताण असूनही स्थिर उत्पन्न सुनिश्चित करते. ही जात तांबेरा आणि पावडर बुरशी सारख्या बुरशीजन्य रोगांना प्रतिरोधक आहे. ज्यामुळे या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकते.
ही जात राजस्थानच्या शुष्क परिस्थितीसाठी आदर्श असल्याचा दावा या संशोधन केंद्राने केला आहे. ट्रॉम्बे राज विजय गहू-155 (TRVW-155) ही गव्हाचे आणखी एक नव्याने विकसित झालेली जात मध्य प्रदेश राज्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
ही जात राजमाता विजयराजे सिंधिया कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. यात जस्त आणि लोहाचे प्रमाण अधिक असून या जातीच्या गव्हापासून उत्कृष्ट चपाती बनवता येणार आहेत.
या जातीच्या गव्हाची क्वालिटी उच्च दर्जाची असून यामुळे या गव्हाला बाजारात चांगला दर मिळू शकणार आहे. ही जात तांबेरा आणि पावडर बुरशी यांसारख्या बुरशीजन्य रोगांमध्ये प्रतिकारकारक असल्याचे आढळले असल्याचा दावा संस्थेने केला आहे.