‘या’ दिवशी देशाला मिळणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! पुण्यालाही मिळणार भेट
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत ही देशातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि देशातील सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेनपैकी एक आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली असून या गाडीचा कमाल वेग ताशी १८० किलोमीटर इतका आहे. मात्र या गाडीचा ऑपरेशनल वेग हा 130 किलोमीटर प्रति तास एवढाच आहे.
ही ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली.
सध्या देशात 65 वंदे भारत गाड्या सुरु आहेत. ही गाडी 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 280 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. आता या मालिकेत आणखी एका नव्या अध्यायाची भर पडणार आहे.
देशाला लवकरच पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे. नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर ही पहिली गाडी सुरू होणार आहे. म्हणजे लवकरच पृथ्वीचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या काश्मीर खोऱ्यातही लोकांना वंदे भारतची सुविधा मिळणार आहे.
ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक म्हणजेच USBRL वर धावणार आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर ही गाडी जानेवारी 2025 पासून धावणार आहे. या गाडीचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी माहिती दिली आहे की, पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात नवी दिल्ली ते काश्मीरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील. ही गाडी 800 किलोमीटरच अंतर अवघ्या 13 तासात पार करणार आहे.
या वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनच्या वेळेबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून संध्याकाळी ७ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही ट्रेन अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा संगलदन आणि बनिहाल रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
पुण्यालाही मिळणार वंदे भारत स्लीपर
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला सुद्धा वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळू शकते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट सुद्धा घेतली होती.
दरम्यान अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असेही आश्वासन दिलेले समजते. यामुळे भविष्यात पुणे ते दिल्ली दरम्यान देखील वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. नक्कीच या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर पुणे ते दिल्ली दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.