Goat Rearing Tips: शेळीचे वय ओळखण्याची आहे ‘ही’ गुपित ट्रिक… फक्त हा सोपा फार्मूला वापरा!
Goat Rearing:- शेळीपालन करणाऱ्या किंवा बाजारातून शेळी खरेदी करणाऱ्या प्रत्येक पशुपालकासाठी शेळ्यांचे वय ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य वयाची शेळी खरेदी केल्याने तिची उत्पादकता आणि आरोग्य सुधारते. शेळीचे वय निश्चित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे तिच्या दातांचा अभ्यास करणे. दातांच्या वाढीच्या प्रक्रियेवरून शेळीचे वय सहज ओळखता येते, त्यामुळे योग्य वयाची शेळी निवडणे सोपे होते.
शेळीच्या दातांवरून वय ओळखण्याची पद्धत
शेळ्यांच्या वरच्या जबड्यात चावण्याचे किंवा तोडण्याचे दात नसतात. त्या ठिकाणी एक कठीण पेंड (Hard Pad) असतो, ज्यामुळे त्या अन्न चावतात. मात्र, खालच्या जबड्यात त्यांना दात असतात आणि त्यांच्या वाढीवरून वयाचा अंदाज बांधता येतो. करडाच्या जन्माच्या वेळी त्याला 'दुधाचे दात' (Milk Teeth) असतात. हे दात काही वर्षांनंतर गळतात आणि त्याजागी कायमचे दात येतात. या बदलाच्या कालावधीनुसार शेळीचे वय निश्चित करता येते.
करडाच्या दुधाच्या दातांचा वाढीचा क्रम
करडाच्या जन्मानंतर पहिल्या आठवड्यात समोरच्या दुधाच्या दातांच्या तीन जोड्या उगवतात. चौथी जोडी साधारणतः वयाच्या ४थ्या आठवड्यात विकसित होते. करडू जसजसे मोठे होते, तसतसे हे दुधाचे दात गळतात आणि त्याजागी कायमचे दात येतात.
दुधाचे दात गळण्याची प्रक्रिया ठरावीक वयात घडते. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
पहिली जोडी (15 ते 18 महिने): या वयोगटात पहिली जोडी दुधाचे दात गळून त्याजागी कायमचे दात येतात. जर शेळीला फक्त एकच जोडी कायमचे दात असतील, तर तिचे वय अंदाजे 1.5 ते 2 वर्ष असते.
दुसरी जोडी (20 ते 25 महिने): दुसरी जोडी कायमचे दात 20 ते 25 महिन्यांदरम्यान उगवतात. जर दोन जोड्या कायमच्या दातांच्या असतील, तर शेळीचे वय अंदाजे 2 वर्षांपेक्षा थोडे अधिक आहे.
तिसरी जोडी (24 ते 31 महिने): 24 ते 31 महिन्यांत तिसरी जोडी कायमचे दात येतात. त्यामुळे शेळीचे वय अंदाजे 2.5 ते 3 वर्ष असल्याचे ओळखता येते.
चौथी जोडी (28 ते 35 महिने): 28 ते 35 महिन्यांत चौथी आणि अंतिम जोडी कायमचे दात येतात. जर शेळीच्या तोंडात चारही जोड्या कायमच्या दातांच्या असतील, तर तिचे वय 3 ते 3.5 वर्षांपेक्षा अधिक आहे.
शेळी खरेदी करताना वय ओळखण्याचे महत्त्व
शेळीपालनासाठी योग्य वयाची शेळी निवडणे उत्पादकतेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर शेळी खरेदी करताना तिचे वय योग्य पद्धतीने तपासले नाही, तर ती खूप वृद्ध किंवा खूप लहान असू शकते, ज्याचा परिणाम तिच्या दुधाच्या उत्पादनावर, प्रजननक्षमतेवर आणि आरोग्यावर होऊ शकतो.
कायमचे दात आणि शेळीची उत्पादकता
शेळीचे वय ओळखल्याने तिच्या प्रजननक्षमतेचा अंदाजही घेता येतो. 1.5 ते 2 वर्षांच्या शेळ्या पहिल्यांदाच गर्भधारणेसाठी तयार होतात. जर एखादी शेळी 4 वर्षांपेक्षा अधिक वयाची असेल, तर तिच्या प्रजननक्षमतेत घट होऊ शकते. वृद्ध शेळ्यांचे दात झिजलेले किंवा तुटलेले असतात, ज्यामुळे त्यांना अन्न चावणे कठीण जाते आणि त्यामुळे त्यांचे आरोग्यही बिघडू शकते.
अशा पद्धतीने शेळीपालन करताना शेळीचे वय ओळखणे हे एक महत्त्वाचा कौशल्ये आहे. वय ठरवण्यासाठी शेळीच्या दातांचा अभ्यास करणे ही सर्वात विश्वासार्ह आणि सोपी पद्धत आहे. त्यामुळे पशुपालकांनी शेळी खरेदी करताना तिचे दात तपासून तिचे वय निश्चित करावे, जेणेकरून चांगल्या आरोग्याची आणि अधिक उत्पादकतेची शेळी निवडता येईल.या तंत्राचा योग्य वापर केल्यास शेळीपालन अधिक फायदेशीर आणि यशस्वी होऊ शकते.