Aadhar Card चा गैरवापर होतोय? बायोमेट्रिक्स लॉक करा आणि आधार सुरक्षित ठेवा.. जाणून घ्या सोपी पद्धत
Aadhar Card:- आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचं आणि अनिवार्य ओळखपत्र आहे. सरकारी योजनांपासून ते बँक खात्यांपर्यंत, मोबाईल सिमपासून ते सरकारी व खासगी सेवांपर्यंत अनेक ठिकाणी आधार क्रमांक आवश्यक आहे. मात्र, आधार क्रमांकाची किंवा त्याच्या फोटोकॉपीची चुकीच्या पद्धतीने देवाणघेवाण केल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधार सुरक्षित ठेवणं आणि त्याच्या गैरवापरावर सतत लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आधारचा गैरवापर झाला आहे का, हे कसं ओळखायचं? आधार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? आणि गैरवापर झाल्यास तक्रार कशी करावी? यासंबंधी संपूर्ण माहिती येथे दिली आहे.
आधार कार्डचा गैरवापर ऑनलाइन कसा तपासायचा?
जर तुम्हाला संशय असेल की तुमच्या आधार क्रमांकाचा कुठेतरी गैरवापर झाला आहे, तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याच्या वापराबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता. UIDAI च्या myAadhar वेबसाईटवर लॉगिन करून Authentication History या पर्यायाद्वारे आधार क्रमांकाचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, हे सहज तपासता येऊ शकतं.
लॉगिन करण्यासाठी आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि मोबाइलवर आलेला OTP आवश्यक असतो. एकदा लॉगिन केल्यानंतर, तुम्ही कोणत्या तारखांना आधार कार्डचा वापर केला आहे, हे पाहू शकता. जर यात कोणतीही संशयास्पद नोंद आढळली, तर UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन लगेच तक्रार करावी.
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स लॉक करण्याची प्रक्रिया
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बायोमेट्रिक्स लॉक करणं. बायोमेट्रिक्स म्हणजे तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन, जे आधार प्रमाणीकरणासाठी वापरण्यात येतात. जर हे लॉक केलं, तर कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या आधारचा गैरवापर करू शकत नाही.
बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी तुम्ही myAadhar वेबसाईटला भेट द्यावी. तिथे “आधार लॉक/अनलॉक” हा पर्याय निवडून, आवश्यक माहिती भरावी. यामध्ये तुमचा व्हर्च्युअल आयडी (VID), संपूर्ण नाव, पिनकोड आणि कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर OTP येईल, तो टाकल्यानंतर आधार बायोमेट्रिक्स लॉक होईल. बायोमेट्रिक्स अनलॉक करायचा असल्यास, त्याच प्रक्रियेद्वारे तो पुन्हा सक्रिय करता येतो.
गैरवापर झाल्यास तक्रार कशी करावी?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे, तर तुम्ही UIDAI कडे त्वरित तक्रार नोंदवू शकता. यासाठी UIDAI ने काही अधिकृत पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही 1947 या UIDAI च्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता. याशिवाय, help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करून तुमच्या शंका आणि समस्या मांडू शकता. तक्रारीसाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरही ऑनलाइन अर्ज करता येतो.
आधार कार्डच्या फोटोकॉपीचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय
अनेकदा विविध कार्यालयांमध्ये आधार कार्डची फोटोकॉपी मागितली जाते. मात्र, ही फोटोकॉपी चुकीच्या पद्धतीने वापरली गेल्यास तुमच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आधारच्या फोटोकॉपीवर काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम, फोटोकॉपीवर सही आणि तारीख लिहा. यामुळे ती फोटोकॉपी केवळ विशिष्ट कामासाठी वापरण्यात यावी, अशी खात्री होईल. उदाहरणार्थ, "फक्त बँक खात्यासाठी" किंवा "सिम कार्डसाठी" असे लिहिल्यास, ती फोटोकॉपी अन्यत्र वापरणं शक्य होणार नाही.
Masked Aadhaar वापरणं हा सर्वात सुरक्षित पर्याय
Masked Aadhaar मध्ये आधार क्रमांकाच्या पहिल्या आठ संख्या झाकलेल्या असतात, त्यामुळे संपूर्ण क्रमांक कोणालाही दिसत नाही. myAadhar वेबसाईटवर जाऊन “Download Aadhaar” हा पर्याय निवडल्यावर, तिथे "Masked Aadhaar पाहिजे का?" असा पर्याय विचारला जातो. त्यावर क्लिक करून डाउनलोड केल्यास सुरक्षित आधार कार्ड मिळते, जे तुम्ही कुठेही वापरू शकता.
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड अत्यंत संवेदनशील ओळखपत्र बनलं आहे. त्यामुळे त्याचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. आधार क्रमांकाचा वापर कुठे आणि कसा होत आहे, यावर नियमित लक्ष ठेवा. तुमच्या आधारचा सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक्स लॉक करा आणि आवश्यकतेनुसार Masked Aadhaar चा वापर करा. जर तुम्हाला आधारच्या गैरवापराबाबत कुठलाही संशय असेल, तर त्वरित UIDAI ला कळवा आणि आवश्यक ती तक्रार नोंदवा. योग्य काळजी घेतल्यास तुमचं आधार कार्ड सुरक्षित राहील आणि भविष्यात कोणताही फसवणुकीचा धोका टाळता येईल.