ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज भरणा सुरू ! महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार साडेतीन लाख रुपये ! अर्ज कसा आणि कुठे करावा?
Tractor Subsidy News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील काही शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना देखील राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
खरंतर ट्रॅक्टर हे शेतीमध्ये फारच उपयोगी ठरत आहे. पूर्वी जी कामे मनुष्यबळाच्या माध्यमातून होत असत ती कामे आता ट्रॅक्टर मुळे सोपी झाली आहेत. जमिनीच्या पूर्व मशागतीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सर्वच ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर होतोय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
परंतु प्रत्येकच शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जात आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जात असून या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयांचे अनुदान मिळते.
मात्र, याचा लाभ फक्त आणि फक्त एससी कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना मिळतो. म्हणजे राज्यातील सर्वच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच या अंतर्गत दिले जाणारे अनुदान हे फक्त आणि फक्त स्वयंसहाय्यता बचत गटाला मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. सध्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येतील अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
किती अनुदान मिळणार
महाराष्ट्र राज्यातील एस सी कॅटेगिरीमधील स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान दिले जात आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या बचत गटांना कमाल 3 लाख 50 हजार एवढे अनुदान मिळते.
अर्ज कुठे करावा लागणार
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र ठरणाऱ्यांना समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. https://mini.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करण्याचा अर्ज उपलब्ध भरायचा आहे.
यात सुरुवातीला बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावेच रजिस्ट्रेशन करावे अशी सूचना दिसेल. त्याखाली संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी, पासवर्ड, बचत गटाचे नाव, अर्ज करावयाचा जिल्हा ही माहिती भरावी लागणार आहे.
त्याखाली Register बटणावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. दरम्यान, ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करावी लागणार आहे.