Grape Crop Cultivation: माजी सैनिकाला द्राक्ष शेतीत मोठा धक्का! आठ लाखांची कमाई पण खर्च किती?.. वाचा धक्कादायक सत्य
Grape Cultivation:माजी सैनिक धनाजी पाटील यांनी नागठाणे येथे आपल्या 12 एकर शेतीपैकी 62 गुंठे क्षेत्रात द्राक्ष बाग फुलवली आहे. 2014 पासून ते कृष्णा व्हरायटीचे उत्पादन घेत असून यंदा अतिवृष्टीच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पीक वाचवण्यासाठी कठोर मेहनत घेतली. 9 सप्टेंबर 2024 रोजी उभ्या पावसात त्यांनी द्राक्ष बागेची छाटणी केली.
मात्र, त्यानंतरच्या काळातही हवामानाने सतत अडथळे आणले. अतिवृष्टी आणि दाट धुके यामुळे द्राक्ष बागेवर विपरीत परिणाम झाला. वाढत्या दमट हवामानामुळे द्राक्ष पिकावर कीड आणि बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली. परिणामी, रोग नियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. हवामानाच्या या अस्थिरतेमुळे 62 गुंठे द्राक्ष बागेसाठी तब्बल 5 लाख 77 हजार रुपये इतका खर्च आला.
द्राक्ष बाग वाचवण्यासाठी केलेली मेहनत
पीक जोमात येत असतानाच 100 व्या दिवशी बागेवर वटवाघळांचा मोठा हल्ला झाला. द्राक्षांमध्ये गोडी वाढण्याच्या टप्प्यावर वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात फळांचे नुकसान केले. वटवाघळांचा धोका लक्षात घेऊन पाटील यांनी घाईघाईने बागेवर जाळी लावली. या उपायासाठी त्यांना 62 हजार रुपये खर्च आला.
शेतकऱ्यांसाठी हवामान आणि कीटक यांचा सामना करणे जरी नित्याचे असले तरी या वर्षी या दोन्ही समस्यांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर हानी केली. कष्टाने जोपासलेल्या द्राक्ष बागेला त्यांनी अतिवृष्टी आणि वटवाघळांपासून वाचवले.
मात्र विक्रीच्या वेळी पुन्हा हवामानाचा फटका बसला. हार्वेस्टिंगच्या वेळी पुन्हा एकदा दाट धुके वाढले. त्यामुळे द्राक्ष मालाला मोठ्या प्रमाणावर तडे गेले. परिणामी दीड ते पावणे दोन टन मालाचा सुकवा झाला आणि उत्पादनात घट झाली.
62 गुंठे क्षेत्रात मिळालेले उत्पादन
यंदा 62 गुंठे क्षेत्रात एकूण 7 टन 840 किलो उत्पादन मिळाले.ज्यामुळे 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु अपेक्षित उत्पादन न झाल्याने धनाजी पाटील यांना समाधान वाटले नाही. त्यांच्या गणितानुसार, जर हवामान आणि अन्य अडथळे नसते तर अधिक उत्पादन नक्कीच मिळाले असते.
बाजारात द्राक्षांना प्रति 4 किलोसाठी विक्रमी 551 रुपये दर मिळाला. परंतु उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास हा दर पुरेसा नाही असे पाटील यांचे मत आहे. त्यांच्या मते 1 किलो द्राक्ष उत्पादनासाठी जवळपास 100 रुपये खर्च आला.
त्यामुळे 4 किलो द्राक्षासाठी मिळणारा 551 रुपयांचा दर तुलनेने कमी आहे. या दरातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याला समाधानकारक नफा मिळत नाही. मेहनतीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
धनाजी पाटील यांनी मांडलेले द्राक्ष शेतीचे सत्य
यंदाच्या अनुभवावरून धनाजी पाटील यांनी द्राक्षशेतीतील वाढते संकट आणि खर्च यावर प्रकाश टाकला. शेतकरी कष्टाने उत्पादन घेत असले तरी हवामान बदल, वाढते उत्पादन खर्च, कीटक आणि बाजारातील अस्थिरता यामुळे त्यांचा नफा मर्यादित राहतो.
द्राक्ष शेती ही अत्यंत मेहनतीची आणि जोखीम असलेली असल्यामुळे योग्य दर मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्पादन खर्च सतत वाढत असताना बाजारातील दर स्थिर नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यांकन होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.