Dalimb Lagvad: डाळिंब लागवडीसाठी कोणती वाण आहे सर्वात्तम?.. फुले आरक्ता,मृदुला की फुले भगवा सुपर! जाणून घ्या माहिती
Agriculture News:- महाराष्ट्र राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या प्रगतशील जातींमुळे मोठी क्रांती झाली आहे. गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्तम गुणवत्तेची फळे मिळत आहेत. यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादनाला नवा आयाम मिळाला असून, या जातींमुळे राज्यातील डाळिंब निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
डाळिंब फळ पिकाच्या महत्त्वपूर्ण व्हरायटी
गणेश
दर्जेदार आणि चविष्ट डाळिंब
डाळिंबाच्या अनेक जाती असल्या तरी 'गणेश' ही जात सर्वोत्कृष्ट मानली जाते. ही जात स्व. डॉ. चिमा यांच्या संशोधनातून फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसित करण्यात आली. गणेश वाणाची फळे मध्यम आकाराची असून त्यातील बिया मऊ असतात. दाण्यांचा रंग फिकट गुलाबी आणि चव गोडसर असल्याने या जातीला ग्राहकांकडून चांगली मागणी असते.
जी-१३७ – अधिक गोडसर आणि आकर्षक रंग
गणेश वाणामधून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या जी-१३७ वाणाला अधिक गोडसर स्वाद आणि गडद रंग प्राप्त झाला आहे. या जातीच्या दाण्यांचा आकार मोठा असून त्यांची गोडी गणेश वाणाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे ही जात बाजारात अधिक लोकप्रिय झाली आहे.
मृदुला
आकर्षक लालसर रंग व मऊ बिया
मृदुला वाण ही गणेश आणि गुल-ए-शाह रेड या जातींच्या संकरातून तयार करण्यात आलेली आहे. या जातीच्या फळांचे वजन ३०० ते ३५० ग्रॅमच्या दरम्यान असते. फळांचा रंग आणि दाण्यांचा रंग गडद लालसर असतो, त्यामुळे ते दिसायला आकर्षक असतात. यामध्ये बीज अतिशय मऊ असून, दाण्यांचा आकार मोठा आणि गोडसर चवीचा असतो. शिवाय, या फळांची साल चमकदार आणि लालसर असल्यामुळे ते बाजारात सहज विकले जाते.
फुले आरक्ता -अधिक उत्पादनक्षम आणि आकर्षक
फुले आरक्ता वाण गणेश आणि गुल-ए-शाह रेड या वाणांच्या संकरित पिढीपासून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे. या जातीची फळे मोठी, गोडसर आणि आकर्षक असतात. तसेच, दाणे मऊ, मोठे आणि लालसर रंगाचे असतात. साल चमकदार आणि गडद लाल असल्यामुळे या जातीला बाजारात अधिक मागणी आहे.
भगवा – निर्यातीसाठी सर्वोत्तम आणि रोग प्रतिकारक जात
भगवा वाण अधिक उत्पादनक्षम असून त्यात फळांची अपेक्षित गुणवत्ता आढळते. या जातीची फळे १८० ते १९० दिवसांत परिपक्व होतात. फळांचा आकार मोठा, गोडसर दाणे आणि आकर्षक रंग असतो. शिवाय, या जातीची फळे जाड सालाची असल्यामुळे ती दूरच्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी उपयुक्त ठरतात. इतर वाणांच्या तुलनेत भगवा वाण फळांवरील काळ्या ठिपक्यांच्या रोगास तसेच फुलकिड्यांसाठी कमी संवेदनशील आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या वाणाला विशेष पसंती मिळाली आहे.
फुले भगवा सुपर – अधिक उत्पादन आणि निर्यातीसाठी आदर्श
भगवा वाणामधून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेला 'फुले भगवा सुपर' वाण अधिक उत्पादनक्षम आणि उत्कृष्ट गुणवत्तेचा आहे. या जातीची फळे १७६ ते १८० दिवसांत परिपक्व होतात. फळांचा रंग गर्द केशरी असून आकार मध्यम असतो. सरासरी वजन २७१ ते २९९ ग्रॅम असते. ही जात गोडसर, मऊ दाण्यांची आणि अधिक रसयुक्त असल्यामुळे ग्राहकांना विशेष आकर्षित करते.
डाळिंब शेतीतील प्रगती
या सर्व सुधारित जातींमुळे महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम फळे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळत आहे. निर्यातीला चालना मिळाल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला आहे. नवीन संशोधन आणि सुधारित जातींमुळे डाळिंब शेती अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी डाळिंब शेतीकडे अधिक प्रमाणात वळत आहेत आणि त्याचा त्यांना चांगला फायदा होत आहे.