कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Farmer Success Story: बटाट्याची 20 लाखांची विक्री केली पूर्ण.. अजून मिळेल 8 लाखांचा नफा! वाचा शेतकऱ्याचे बटाटा शेतीचे गणित

02:12 PM Feb 13, 2025 IST | Krushi Marathi
potato crop

Potato Cultivation:- शेतीत मेहनत आणि नियोजन असेल तर खडकाळ जमिनीतही सोनं पिकवता येतं हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खंडाळा गावच्या विलास शेषराव सोनवणे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असलेल्या सोनवणे यांनी आपल्या 16 एकर शेतात बटाट्याची लागवड केली आणि एकरी 100 क्विंटल उत्पन्न घेत ऐतिहासिक यश मिळवलं.

Advertisement

या बटाट्याला बाजारात 15 ते 16 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला असून आतापर्यंत त्यांनी 20 लाख रुपयांची विक्री पूर्ण केली आहे. संपूर्ण उत्पादनाचा विचार करता त्यांना एकूण 28 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

Advertisement

बटाटा लागवडीचे नियोजन कसे केले?

शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या सोनवणे यांनी मिरची उत्पादनात यश मिळवले होते. मिरचीसाठी मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांच्या मुकादमाने त्यांना बटाटा लागवडीची कल्पना दिली.

Advertisement

या संधीचा फायदा घेत त्यांनी तात्काळ पुणे जिल्ह्यातील मंचर येथून पुखराज वाणाचे बियाणे 3000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली. 16 एकर क्षेत्रासाठी तब्बल 160 क्विंटल बियाणे वापरण्यात आले. बटाट्यांची लागवड ट्रॅक्टरच्या मदतीने करण्यात आली. ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचले.

Advertisement

रोग व्यवस्थापन आणि खत नियोजन

बटाट्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सुरुवातीच्या आणि शेवटच्या अवस्थेत येणाऱ्या करपा रोगावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असते. यासाठी योग्य प्रमाणात औषधफवारणी केली गेली.

त्याचप्रमाणे बेसल डोस, कीटकनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचे ठिबक सिंचनाद्वारे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले. केवळ 70 दिवसांत पीक परिपक्व झाले. ज्यामुळे अत्यल्प कालावधीत मोठे उत्पन्न मिळाले.

विक्री आणि बाजारातील मागणी

बटाटा काढणीसाठी 25 ते 30 महिला मजूर दिवसाला काम करत आहेत. तसेच हार्वेस्टिंगसाठी विशेष ट्रॅक्टर मागवण्यात आले आहे. सध्या रोज 80 ते 90 क्विंटल बटाट्यांची विक्री संभाजीनगर, जळगाव आणि भोकरदन बाजारपेठांमध्ये 15 ते 16 रुपये प्रति किलो दराने केली जात आहे. आतापर्यंत 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून अजून 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याचा सल्ला

विलास सोनवणे यांनी आपल्या यशस्वी प्रयोगातून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे प्रयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे विचार करून कमी कालावधीच्या आणि अधिक नफ्याच्या पिकांवर भर दिला.

त्यांच्या मते शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन नवीन,अधिक फायदेशीर आणि अल्पावधीत तयार होणारी पिके घ्यावीत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास नफा वाढवता येईल आणि शेती अधिक फायदेशीर व्यवसाय ठरेल असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे.

Next Article