Success Story: पाणी नाही म्हणून चिंतेत आहात? हा शेतकरी बघा.. कमी पाण्यात कमवत आहे लाखो रुपये!
Farmer Success Story:- वाशिम जिल्ह्यातील हिसई (ता. मंगरुळपीर) येथील बाळासाहेब जाधव यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर पाणीटंचाईवर मात करत समृद्ध शेतीचा मार्ग खुला केला आहे. दुष्काळी भागात शेती करणे मोठे आव्हान असते.परंतु जाधव यांनी शेततळ्याचा प्रभावी वापर करून हे आव्हान संधीमध्ये बदलले. आज त्यांच्या शेतातील हिरवाई आर्थिक समृद्धीची साक्ष देत आहे.
हिसई गाव पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहे. पावसाळ्यात जरी काही प्रमाणात पाऊस पडला तरी उन्हाळ्यात पाणी टिकून राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या अडचणी येतात. हीच समस्या ओळखून बाळासाहेब जाधव यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेच्या सहाय्याने आपल्या शेतात शेततळे उभारले.
३४ मीटर लांब, ३४ मीटर रुंद आणि ४.७० मीटर खोल शेततळे तयार करून त्यास प्लास्टिक आच्छादन देण्यात आले. त्यामुळे पाण्याचा योग्य साठा राखला जातो आणि उन्हाळ्यातही सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध राहते.
पाण्याचे व्यवस्थापन आणि फळबाग लागवडीवर दिला भर
पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे त्यांनी फळबाग लागवडीकडे लक्ष दिले. त्यांनी आपल्या शेतात संत्रा, सीताफळ आणि पेरू या फळपिकांची लागवड केली. मात्र, या फळबागा यशस्वी होण्यासाठी पुरेशा सिंचन सुविधेची गरज होती.
म्हणूनच त्यांनी आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय न होता झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळाले आणि पिकांची वाढ जोमदार झाली. याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला आणि शेती अधिक फायदेशीर ठरली.
शेततळ्याचा झाला मोठा फायदा
शेततळ्याच्या मदतीने आणि आधुनिक सिंचन पद्धतीच्या वापरामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले. पेरूच्या एका हेक्टर बागेतून यावर्षी २.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर तीन एकर सीताफळाच्या बागेतून सुमारे २ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. संत्र्याचे पीकही चांगले आले असून, त्यातूनही भरघोस नफा होण्याची अपेक्षा आहे.
कृषी विभागाची मिळाली अनमोल साथ
बाळासाहेब जाधव यांच्या यशस्वी शेती प्रवासात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. कृषी सहाय्यक पुरुषोत्तम उखळकर, कृषी पर्यवेक्षक भास्कर लढाड, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे आणि तत्कालीन कृषी सहाय्यक अमोल हीसेकर यांनी वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करून त्यांना शेतीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत केली.
शेततळ्याच्या मदतीने फळबाग शेतीत मोठे यश मिळवणारे बाळासाहेब जाधव हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाने शेती कशी फायदेशीर होऊ शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. भविष्यात आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनात वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे.