Success Story:- फक्त साठ झाडांमधून सात लाख रुपये कमवतो ‘हा’ शेतकरी… तुम्हीही अवलंबा कमाईचा हा सोपा फॉर्म्युला
Chiku Lagvad:- आजच्या काळात पारंपरिक शेतीला पर्याय शोधत अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यापैकीच एक नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव येथील शशिकांत पुदे यांचे. त्यांनी तब्बल 21 वर्षांपूर्वी केवळ 60 चिकूच्या झाडांची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली होती.
आज त्याच झाडांतून ते दरवर्षी 5 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. हे यश त्यांच्या मेहनतीचा आणि सेंद्रिय शेतीवरच्या विश्वासाचा परिणाम आहे.
कालीपत्ती जातीच्या चिकूची लागवड ठरली फायद्याची
शशिकांत पुदे यांनी कालीपत्ती या उच्च दर्जाच्या चिकूच्या जातीची लागवड केली आहे. या झाडांमधून त्यांना प्रत्येक झाडापासून 500 ते 600 किलो उत्पादन मिळते. आजपर्यंत त्यांनी या चिकू विक्रीतून 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी ही संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी उत्पादनाचा दर्जा उत्तम राखला आहे. त्यामुळे बाजारात त्यांच्या चिकूला चांगली मागणी असून उच्च दरही मिळतो.
चिकू शेतीला दिली दूध व्यवसायाची जोड
केवळ चिकू शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर समाधानी न राहता त्यांनी दुग्ध व्यवसायातही यशस्वी पाऊल टाकले आहे. त्यांनी आपल्या शेतात काजळी खिलार गाईंचा गोठा उभारला असून, त्यांच्याकडे उत्तम जातीच्या दुधाळ गाई आणि वळू आहेत.
त्यांनी केवळ दूध विक्रीवर भर न देता तूप निर्मिती सुरू केली. ज्यामुळे त्यांना अधिक फायदा होऊ लागला. याशिवाय राज्यभर कालवड आणि वळूंची मोठी मागणी असल्याने त्यांच्याकडून अनेक ठिकाणी विक्री केली जाते. यामुळे त्यांचे दुग्ध व्यवसायातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढले आहे.
मल्टी क्रॉप शेतीवर दिला भर
शशिकांत पुदे हे मल्टी-क्रॉप शेतीच्या संकल्पनेवर काम करणारे प्रयोगशील शेतकरी आहेत. चिकूशिवाय त्यांनी काजू, पेरू आणि आंब्याची लागवड देखील केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात वर्षभर उत्पादन सुरू राहते आणि त्यांना वेगवेगळ्या हंगामात सतत उत्पन्न मिळत राहते.
त्यांच्या या मेहनतीच्या आणि यशस्वी शेती प्रयोगामुळे त्यांना राज्य शासनाचा ‘उद्यानपंडित पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा अधिक फायदा मिळवण्यासाठी नवे प्रयोग यशस्वीपणे करून दाखवले आहेत.
शशिकांत पुदे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. कमी जागेत, कमी झाडांमध्येही अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर सेंद्रिय शेती आणि मल्टी-क्रॉप शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
सेंद्रिय उत्पादनामुळे बाजारपेठेत चांगला दर मिळतो. उत्पादनाचा दर्जा टिकून राहतो आणि दीर्घकाळ नफा कमावता येतो. त्यांच्या चिकू शेतीपासून ते दुग्ध व्यवसायापर्यंतचा संपूर्ण प्रवास हेच सिद्ध करतो की, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतूनही मोठे उत्पन्न मिळवता येते.