एका एकरातील जांभळ्या वांग्याचा प्रयोग ठरला यशस्वी! 2 लाख खर्चून कमावले 8 लाख
Farmer Success Story:- शेती तुमच्याकडे कमी जरी असली परंतु त्या शेतीमध्ये तुम्ही कोणत्या पिकांची लागवड करत आहात व त्याचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करत आहात? यावर प्रामुख्याने शेतीतून मिळणारे उत्पादन अवलंबून असते.
आता शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाने शिरकाव केल्यामुळे कमीत कमी क्षेत्रात देखील शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी सहजरीत्या मिळवतात. योग्य व्यवस्थापनाच्या पद्धती आणि परंपरागत शेतीची पद्धत सोडून शेतीमध्ये आलेली आधुनिकता या गोष्टींना कारणीभूत आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण दौंड येथील जगताप दाम्पत्याची यशोगाथा बघितली तर आपल्याला याची कल्पना येऊ शकते.प्रशांत जगताप व त्यांच्या पत्नी प्रिया जगताप यांनी जांभळ्या वांग्याची लागवड एका एकर क्षेत्रावर केली व तब्बल आठ लाख रुपयांची कमाई त्यांना मिळाली आहे.
एका एकर जांभळ्या वांग्यातून मिळाले आठ लाख रुपयांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दौंड येथील प्रशांत जगताप व त्यांच्या पत्नी प्रिया जगताप हे कायम शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी एका एकर क्षेत्रावर जांभळ्या वांग्याची लागवड करण्याचे ठरवले व ही लागवड केली.विशेष म्हणजे त्यांनी 19 एकर शेतामध्ये ऊस तसेच पालेभाज्या आणि इतर फळांची देखील लागवड केलेली आहे.
योग्य शेती व्यवस्थापन आणि सिंचनाच्या योग्य सोयी असल्यामुळे या जोडप्याला चांगले आर्थिक उत्पन्न शेतीच्या माध्यमातून मिळत आहे.परंतु या सगळ्या पिकांमध्ये मात्र जांभळ्या वांग्यापासून मिळालेले उत्पन्न त्यांना खूप फायद्याचे ठरले आहे.दौंड तालुका जर आपण बघितला तर त्या ठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
परंतु जगताप दांपत्याने जांभळ्या वांग्याचा वेगळाच प्रयोग केला व तो यशस्वी करून दाखवला. जांभळे वांगे हे खायला देखील अत्यंत रुचकर असते व या वांग्याला पुण्यातील हॉटेलमध्ये खूप मोठी मागणी आहे. या संधीचे सोने करत जगताप दांपत्य त्यांच्या शेतातील वांगी पुण्यातील हॉटेल्सला पुरवतात व किलोला पंधरा ते पंचवीस रुपये इतका दर त्यांना सध्या मिळत आहे.
तसेच जांभळ्या वांग्याची मागणी सतत वाढत असल्यामुळे नक्कीच दर देखील टिकून आहेत. जगताप दांपत्याने एका एकर जमिनीवर जांभळ्या वांग्याची लागवड केली व त्यांना लागवडीपासून तर आता काढणीपर्यंत संपूर्ण दोन लाख रुपयाचा खर्च यासाठी आला व आतापर्यंत त्यांनी तब्बल आठ लाख रुपयांची कमाई या माध्यमातून केलेली आहे.
त्यांनी पिकवलेल्या एक एक वांग्याचे वजन 300 ते 400 gm इतके आहे. साधारणपणे या वांग्याची काढणी एक डिसेंबर पासून सुरू झालेली आहे व अजून पर्यंत या वांग्याचे उत्पादन त्यांना मिळत आहे. त्यामुळे जगताप दांपत्याने केलेल्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा परिसरात असून शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
जगताप दाम्पत्याच्या या यशोगाथावरून आपल्याला दिसून येते की जर योग्य प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केला व मागणीप्रमाणे पिकांची लागवड केली तर नक्कीच शेतीमधून चांगले उत्पादन मिळवून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळवता येते.