पेरूच्या ‘या’ वाणाच्या 800 झाडांनी तानाजी भाऊंना दिले 20 लाखाचे उत्पन्न! भन्नाट व्यवस्थापनाने साधली किमया
Farmer Success Story:- शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही पिकाची लागवड केली तर तुम्हाला प्रत्येक बाबतीत काटेकोरपणे नियोजन आणि वेळच्यावेळी व्यवस्थापनाच्या सर्व बाबी पूर्ण करणे खूप गरजेचे असते. पिकांच्या लागवडीपासून तर कापणी पर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या जर वेळेवर पूर्ण केल्या व या सगळ्या व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर नक्कीच कमीत कमी क्षेत्रातून देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येते व हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध देखील करून दाखवलेले आहे.
अगदी या पद्धतीने जर आपण दुष्काळी तालुका म्हणून समजला जाणाऱ्या जत या तालुक्याचा विचार त्याला तर या तालुक्यातील शेगावचे तानाजी बोराडे यांनी दोन एकर शेतीमध्ये 800 व्हीएनआर जातीच्या पेरूची लागवड केली व तब्बल त्या माध्यमातून 20 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. या सगळ्या उत्पन्नामागे किंवा यशामागे जर आपण बघितले तर त्यांचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि कष्ट या सगळ्या गोष्टींचा खूप मोलाचा सहभाग आहे.
दोन एकर पेरू लागवडीतून मिळवले वीस लाखांचे उत्पन्न
जत तालुका म्हटला म्हणजे हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. परंतु आता त्या ठिकाणी म्हैसाळ योजनेचे पाणी वरदान ठरताना दिसून येत आहे व या तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागामध्ये या म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले व येथील शेती आता बहरू लागली आहे.
त्यामुळे आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्याने शेतीमध्ये देखील अनेक नवनवीन प्रयोग करण्याकडे शेतकरी वळत आहेत. याच पद्धतीने जत तालुक्यातील शेगावचे रहिवासी असलेले तानाजी बोराडे यांची शेगाव येथे वीस एकर बागायती शेती असून ते या परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात
तसे पाहायला गेले तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेती असल्याने साहजिकच त्यांना शेतीसंबंधीचे सगळे धडे वडिलांकडून मिळाले. परंतु तानाजी बोराडे हे मुंबईमध्ये पतपेढीत नोकरीला होते. परंतु शेतीची आवड प्रचंड प्रमाणात होती व तरी देखील ते मुंबईमध्ये नोकरी करत राहिले.
नंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली व गावी येऊन शेतीत लक्ष घातले व शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी दोन एकरमध्ये पेरू लागवड करायचे ठरवले व 800 पेरूची रोपे प्रतिरोप 200 रुपये प्रमाणे छत्तीसगड येथून विकत आणली व दोन एकरमध्ये त्याची लागवड केली.
या सगळ्या पेरूच्या बागेला आणि इतर क्षेत्रातील पिकांना पाण्याची व्यवस्था करता यावी याकरिता विहिरीवर सात एचपी व पाच एचपीच्या मोटारी बसवल्या. तसेच पेरू बागेचे व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाचा वापर केला. पेरूच्या फळावर बाहेरच्या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून फळाला फोम बसवले व दर्जेदार पेरूचे उत्पादन कसे मिळेल याकडे पूर्ण फोकस केला.
आज त्यांचे पेरू काढणीला आले असून ते बाहेर राज्यांमध्ये पेरू विक्रीसाठी पाठवतात व त्याकरिता पॅकिंग बॉक्समध्ये दर्जेदार पेरू पॅक केले जातात व वर्षातून दोन वेळा त्यांना पेरूचे उत्पादन मिळते.
या वेळेला त्यांना सुरुवातीला प्रतिकिलो 130 रुपये व नंतर 70 रुपयापर्यंत दर मिळाला.तानाजी बोराडे यांनी व्हीएनआर पेरूच्या जातीची लागवड केली.
कारण या जातीच्या पेरूंना संपूर्ण देशांमध्ये खूप चांगली मागणी असते व त्यांना या दोन एकर बागेतून वर्षाला 30 टन पेरूचे उत्पादन मिळते व यावर्षी देखील त्यांना चांगले उत्पादन मिळून 20 लाखांचे उत्पन्न हाती मिळाले आहे.