ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उसाची नवीन जात विकसित, वाचा याच्या विशेषता
Sugarcane Farming : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अलीकडेचं ऊसाची एक नवीन जात विकसित करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने फुले ऊस १५००६ हा ऊसाचा नवीन वाण विकसित केला आहे.
उसाची ही नवीन जात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली असून आज आपण याच जातीच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपणास सांगू इच्छितो की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे.
ही जात अधिक उत्पादन देणारा प्रचलित वाण फुले ०२६५ आणि अधिक साखर देणारा वाण को ९४०१२ यांच्या संकरातून फुले ऊस १५००६ हा वाण तयार झाला आहे.
ही संकरीत जात उच्च उत्पादनासाठी ओळखली जाते आणि या वाणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. आता आपण या वाणाचे काही ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत.
ऊसाच्या नव्या जातीच्या विशेषता खालीलप्रमाणे
ही नवीन जात १६४ टन/हे आणि २३.९२ टन/हे साखर उत्पादन देणारी आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाची ही नवीन जात को ८६०३२ पेक्षा अधिक ऊस व साखर उत्पादन देण्यास सक्षम आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी की ही जात खोडव्यासाठी उत्तम आहे.
या जातीचा ऊस सरळ जाड व उंच, न लोळणारा असल्याने तोडणी यंत्राच्या साहाय्याने कापणी शक्य आहे. यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये या जातीच्या उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या जातीच्या ऊसाची पाने गर्द हिरवी असतात.
देठावर कूस राहत नाही. ऊस दंड गोलाकार, गर्द जांभळ्या रंगाचा असतो. लाल कूज, मर रोगास मध्यम प्रतिकारक असा हा वाण आहे. काणी, पिवळ्या पानाच्या रोगास प्रतिकारक्षम असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
एवढेच नाही तर ही जात विविध प्रकारच्या किडीस प्रतिकारक्षम आहे. खोडकीड, कांडी किडीस कमी बळी पडणारा वाण म्हणून या जातीची ओळख आहे. या उसाला तुरा उशिरा व अल्प प्रमाणात येतो.
पाण्याचा ताण अधिक काळ सहन करण्याची क्षमता या जातीला विशेष बनवते. या वाणामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन तर मिळणारच आहे शिवाय साखर कारखानदारांना देखील चांगले साखर उत्पादन मिळणार आहे.