Sugarcane Factory: 26 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला दगा? कोणत्या साखर कारखान्याने किती पैसे थकवले? वाचा यादी
Agriculture News:- सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची एफआरपी (Fair and Remunerative Price) रक्कम मिळण्यात मोठा विलंब होत आहे. यंदाच्या गाळप हंगामात अवघ्या सात साखर कारखान्यांनीच शेतकऱ्यांचे पैसे पूर्णपणे अदा केले आहेत, तर उर्वरित २६ साखर कारखान्यांनी अद्याप ५३३ कोटी ८८ लाख रुपये थकवले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत, यासाठी साखर आयुक्त कार्यालय आणि सहसंचालक कार्यालयाने सतत पाठपुरावा केला असला तरी अनेक कारखाने देयके अदा करण्यास असमर्थ ठरत आहेत.
या साखर कारखान्यांनी अदा केले शेतकऱ्यांचे पैसे
जिल्ह्यातील श्री पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर, करकंब, ओंकार शुगर, म्हैसगाव (जुना विठ्ठल कॉर्पोरेशन), ओंकार शुगर चांदापुरी, व्ही. पी. शुगर आणि तडवळ या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे अदा केले आहेत. मात्र, इतर २६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले असून, यात काही कारखान्यांची थकबाकी कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
या साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे पैसे
सिद्धेश्वर साखर कारखान्याने २६ कोटी, संत दामाजीने ३३ कोटी ८१ लाख, श्री संत कुर्मदासने ५ कोटी ३८ लाख, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगरने १८ कोटी ३१ लाख, दि सासवड माळीनगरने १२ कोटी १३ लाख, लोकमंगल बीबीदारफळने १७ कोटी ६१ लाख, लोकमंगल भंडारकवठेने तब्बल ५० कोटी, सिद्धनाथ शुगर तिर्हेने ३९ कोटी ६ लाख, जकराया शुगरने २८ कोटी ४८ लाख, इंद्रेश्वर शुगर (बार्शी) ने २२ कोटी ३५ लाख,
भैरवनाथ शुगर (लवंगी) ने १४ कोटी ३७ लाख, युटोपियन शुगरने १५ कोटी ५१ लाख, भैरवनाथ (आलेगाव) ने १६ कोटी ७१ लाख, बबनराव शिंदे (तुर्कपिंपरी) ने ४२ कोटी ३१ लाख, जय हिंद शुगरने ४८ कोटी २९ लाख, आष्टी शुगरने ११ कोटी ५५ लाख, भीमा सहकारी टाकळी सिकंदरने ५ कोटी १४ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळेने १३ कोटी ४१ लाख, सीताराम महाराज खर्डीने २५ कोटी, धाराशिव शुगर (सांगोला) ने ५ कोटी ७२ लाख, श्री शंकर सहकारीने ४ कोटी ६८ लाख, अवताडे शुगरने २७ कोटी, श्री विठ्ठल सहकारी (पंढरपूर) ने ४० कोटी ६५ लाख आणि येडेश्वरी (बार्शी) ने ८ कोटी ५४ लाख रुपये ऊस उत्पादकांना अद्याप दिलेले नाहीत.
याशिवाय, गोकुळ आणि मातोश्री साखर कारखान्यांनी गाळप परवाना न घेता ऊस गाळप केल्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, या कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे किती पैसे दिले आणि किती थकीत आहेत, याबाबतची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला अद्याप पाठवलेली नाही.
या प्रकरणात अनेक साखर कारखान्यांनी साखर उतारा कमी दाखवल्याने शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ कमी मिळत आहे. प्रत्यक्षात ज्या प्रमाणात उतारा असायला हवा, तो दाखवला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना अधिक रक्कम द्यायची असतानाही टक्केवारी चुकीची दाखवली जाते, परिणामी त्यांना मिळणारी रक्कम कमी होते.
साखर आयुक्त कार्यालयाने कठोर पावले उचलण्याची गरज
या पार्श्वभूमीवर, सरकार आणि साखर आयुक्त कार्यालयाने या थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस वेळेवर दिला असूनही त्यांना त्यांची किमान हमीभावाची रक्कम मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवणे,
साखर उतारा चुकीचा दाखवणे आणि परवान्याशिवाय ऊस गाळप करणे यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर ही थकबाकी त्वरित भागवली नाही, तर शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा अधिक वाढतील. त्यामुळे प्रशासनाने वेळ न घालवता कारखान्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.