स्वदेशी ते जागतिक ब्रँड! Parle-G चा भन्नाट प्रवास… तुम्हाला माहिती आहे का? कसे झाले भारताचे लाडके बिस्किट?
Success Story:- गुजरातमधील वलसाड जवळील पारडी गावातून १९०० साली अवघ्या बारा वर्षांचा मोहनलाल चौहान मुंबईत आला. उपजीविकेसाठी त्याने एका टेलरकडे कामाला सुरुवात केली. प्रचंड मेहनतीच्या जोरावर वयाच्या अठराव्या वर्षी त्याने स्वतःचं दुकान सुरू केलं. पुढे ‘डी. मोहनलाल अँड कंपनी’ आणि ‘छिबा दुर्लभ’ या दोन कंपन्या स्थापन करून तो रेशीम व्यवसायात नावारूपास आला. कालांतराने तो "मोहनलाल दयाल" या नावाने ओळखला जाऊ लागला. व्यवसायाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने आपल्या पाच मुलांना—माणेकलाल, पितांबर, नरोत्तम, कांतीलाल आणि जयंतीलाल—नेहमीच व्यवसायाचे धडे दिले.
अशाप्रकारे झाली हाऊस ऑफ पार्लेची स्थापना
मोहनलाल यांना स्वदेशी चळवळीचा प्रभाव होता. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी रेशीम व्यवसाय बंद करून १९२९ मध्ये मुंबईतील विलेपारले येथे ‘हाऊस ऑफ पारले’ नावाची मिठाई आणि बेकरी उत्पादने तयार करणारी कंपनी सुरू केली. त्याकाळी परदेशातून येणारी महागडी बिस्किटं फक्त श्रीमंतांनाच परवडत. मोहनलालना गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी परवडणारी बिस्किटं तयार करायची होती. उत्तम उत्पादनासाठी त्यांनी जर्मनीहून साठ हजार रुपये खर्च करून यंत्रसामग्री आयात केली आणि संत्र्याची कँडी तयार करण्यास सुरुवात केली.
१९३९ मध्ये पार्ले बिस्कीट बाजारात
१९३९ मध्ये पारलेने बिस्किट बाजारात आणली. तेव्हा ब्रिटानिया, ग्लॅक्सो, युनायटेड बिस्कीट, हंटले पामर्स यांसारख्या ब्रिटिश कंपन्या भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व गाजवत होत्या. मात्र पारले बिस्किटं किफायतशीर, स्वादिष्ट आणि स्वदेशी असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश आणि भारतीय सैन्यासाठी पारले ग्लुको बिस्किटं पुरवली जाऊ लागली आणि त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, मात्र गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्याने पारलेने बार्लीपासून बिस्किटं तयार केली आणि त्यांना देशप्रेमाचा रंग दिला. १९६० पर्यंत बाजारात अनेक ब्रँडची बिस्किटं आल्याने ग्राहक संभ्रमित होऊ लागले. म्हणून पारलेने पॅकेजिंग आणि ब्रँडिंगवर भर दिला. त्यांनी पिवळ्या रंगाच्या पॅकेटवर लाल अक्षरं आणि एक लहान मुलीचा फोटो वापरला. १९८२ मध्ये पारले ग्लुकोचं नाव बदलून "पारले-जी" करण्यात आलं. जी म्हणजे ग्लुकोज, मात्र नंतर त्याचा अर्थ "जिनियस" असा करण्यात आला. प्लॅस्टिक पॅकेजिंग सुरू झालं असलं तरी लहान मुलीचा फोटो तसाच ठेवण्यात आला, जो आजही त्या ब्रँडची ओळख आहे.
बिस्किट व्यतिरिक्त पार्लेचे इतर उत्पादन
पारलेने केवळ बिस्किटांपुरते मर्यादित न राहता १९८३ मध्ये मेलडी चॉकोलेट, १९८६ मध्ये मँगो बाईट, १९९६ मध्ये हाईड अँड सीक चोको चिप कुकी, २००० मध्ये २०-२० बटर कुकीज आणि मॅजिक्स अशा विविध उत्पादनांद्वारे बाजारपेठेत स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. २०११ मध्ये प्लॅटिना सिरीज आणल्यानंतर पारले आंतरराष्ट्रीय बाजारातही पोहोचले.
करोना काळात पारले-जीने विक्रीचा उच्चांक गाठला. त्याच्या किफायतशीर किमतीमुळे आणि सहज उपलब्धतेमुळे ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले. सध्या पारले-जी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. २०२३ मध्ये पारलेने १७,२२३ कोटी रुपयांची विक्री केली आणि तब्बल ९०५ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
आज पारले-जी हा केवळ एक ब्रँड नसून प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या आठवणींचा भाग आहे. एका छोट्या खेड्यातून आलेल्या मोहनलाल दयाल यांनी सुरू केलेला हा प्रवास त्यांच्या पुढील पिढ्यांनी आणखी मोठा केला. ॲप्पी, फ्रुटी, बिसलेरी, मोनॅको, क्रॅकजॅक यांसारख्या उत्पादनांमुळे पारलेने आपला विस्तार केला. चहासोबत आनंद देणारं हे बिस्किट आजही लाखो भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.