Spicy Chilli: तिखट प्रेमींनो काळजी घ्या! ‘या’ मिरच्यांनी अनेकांना पाठवले हॉस्पिटलमध्ये… आहेत जगातील टॉप 5 तिखट मिरच्या
Spicy Chilli In India:- भारतात मसालेदार अन्न खाण्याची मोठी परंपरा आहे. अनेक लोक जेवताना हिरव्या मिरच्या स्वतंत्रपणे खातात. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात तिखट मिरच्या कोणत्या आहेत आणि त्या कुठे उगवल्या जातात? या मिरच्या इतक्या तिखट आहेत की त्यांना खाण्याचा विचारच दूर राहिला, स्पर्श करायलाही धाडस लागेल!
या आहेत जगातील टॉप पाच तिखट मिरच्या
भूत जोलोकिया (Ghost Pepper)
भूत जोलोकिया ही जगातील सर्वात तिखट मिरचींपैकी एक आहे. आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश येथे तिची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. २००७ मध्ये तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून नोंद मिळाली होती. भूत जोलोकियाला 'घोस्ट पेपर' असेही म्हणतात. स्थानिक भाषांमध्ये तिला 'उ-मोरोक', 'लाल नागा' किंवा 'नागा जोलोकिया' असेही संबोधले जाते. ही मिरची हजारो रुपये प्रति किलोने विकली जाते आणि भारतातून जगभर निर्यात केली जाते.
ड्रॅगन्स ब्रेथ चिली (Dragon’s Breath)
ब्रिटनमध्ये विकसित करण्यात आलेली ही मिरची तिखटपणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची तिखटता तब्बल २.४८ दशलक्ष स्कोव्हिल युनिट्स मोजली गेली आहे, जी सामान्य मिरचीपेक्षा २००० पट अधिक तिखट आहे! एवढेच नाही, तर ही मिरची औषध म्हणूनही वापरली जाते. असं म्हटलं जातं की जर तिचा एक लहानसा तुकडा जेवणात घातला, तर पूर्ण जेवण अति तिखट बनते. विशेष म्हणजे, तिचा रंग लाल, हिरवा आणि काळा अशा तिन्ही छटांमध्ये आढळतो.
नागा व्हायपर (Naga Viper)
ही एक अत्यंत दुर्मिळ आणि हायब्रिड मिरची आहे, जी फक्त ब्रिटनमध्ये उगवली जाते. तिची खासियत म्हणजे प्रत्येक मिरचीचा रंग वेगळा असतो! नागा व्हायपर मिरची तिखटतेच्या बाबतीत प्रचंड शक्तिशाली असून तिचा एक छोटासा तुकडाही जीभ सुन्न करू शकतो.
कॅरोलिना रीपर (Carolina Reaper)
ही मिरची २०१३ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून नोंदवली गेली. अमेरिकेत या मिरचीची लागवड केली जाते. ही एक संकरित मिरची आहे, जी स्वीट हबानेरो आणि नागा व्हायपर मिरचींच्या संयोगाने तयार करण्यात आली आहे. कॅरोलिना रीपर इतकी तिखट आहे की अनुभवी तिखट खवय्येही तिला खाण्याचे धाडस करत नाहीत!
पेपर एक्स (Pepper X)
कॅरोलिना रीपरला मागे टाकणारी नवीन तिखट मिरची म्हणजे पेपर एक्स होय.अमेरिकेत विकसित झालेल्या या मिरचीने नुकतेच ३.१८ दशलक्ष स्कोव्हिल युनिट्स सह तिखटतेच्या बाबतीत सर्व मिरच्यांना मागे टाकले आहे. ती इतकी तिखट आहे की एका मिरचीचा एक छोटा भागही खाल्ल्यास घसा आणि पोट जळण्याची शक्यता असते.
तिखटपणाचा राजा कोण?
या सर्व मिरच्यांची तिखटता स्कोव्हिल युनिट्स (SHU) या मापन पद्धतीने मोजली जाते. पेपर एक्स (३.१८ दशलक्ष SHU) सध्या जगातील सर्वात तिखट मिरची आहे, तर कॅरोलिना रीपर (२.२ दशलक्ष SHU) दुसऱ्या क्रमांकावर आहे.जर तुम्ही तिखट खाण्याचे शौकीन असाल, तर या मिरच्यांपासून दूर राहा… नाहीतर एक लहानसा तुकडाही जिभेची लाही लाही करेल.