राज्यातील शेतकऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट ! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Soybean News : सोयाबीन ज्याला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात या सोयाबीन पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक असून याला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते.
विदर्भ आणि मराठवाडा विभागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती होत असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होतेय.
मात्र आता शेतकऱ्यांची ही कोंडी दूर होणार आहे कारण की शासकीय सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 12 जानेवारीला सोयाबीनची खरेदीची मुदत संपली होती. मात्र या मुदतीत सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही.
सोयाबीन खरेदी केंद्रात बारदान नसल्याने खरेदीची प्रक्रिया ठप्प होती. विशेष म्हणजे एकाच केंद्रावर अशी परिस्थिती होती असे नाही तर राज्यातील अनेक केंद्रांवर असेच पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी केली जात होती.
याच मागणीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारकडून घेण्यात आला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषिमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ही 31 जानेवारी 2025 पर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार असून शासनाने घेतलेले या निर्णयाचे सोयाबीन उत्पादकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
मात्र असे असले तरी सध्या सोयाबीन खरेदीमध्ये जो गोंधळ सुरू आहे तोच गोंधळ पुढे हे कायम राहिला तर या दिलेल्या मुदतीत सोयाबीनची खरेदी होणार का हा सवाल देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. तथापि सरकारने सोयाबीन खरेदीला दिलेली ही मुदत वाढ नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरणार आहे.
मंडळी महाराष्ट्रात बारदान्याअभावी सोयाबीन खरेदी ठप्प झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या मागणीला अनुसरून, केंद्र सरकारने सोमवारी उशिरा पणन महासंघाला पत्राद्वारे 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची माहिती दिली.