……तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ७ हजार रुपयांचा हमीभाव !
Soybean Farming : सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव घोषित केला आहे.
पण, त्या दराने देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन खरेदी केले जात नाहीये. फारच कमी शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अगदीच पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर तयार झाली आहे.
शेतकऱ्यांना अगदीच कवडीमोल दराने सोयाबीन विकावे लागत आहे. अशातच काँग्रेसने एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
उपराजधानी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत रणदीपसिंग सुरजेवाला बोलत होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन, धान, कापूस, संत्री, कांदा उत्पादक फारच त्रस्त झाले आहेत.
परंतु भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेच्या नशेत मदमस्त झाले आहेत. सोयाबीनचे पीक विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पीकाला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना नाईलाजाने ३ हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीन विकावे लागत आहे. महायुती सरकारने सोयाबीनच्या खरेदीसाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्याला क्विंटलमागे १ हजार ८५३ रुपयाचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रात प्रतिएकर १० क्विंटल उत्पादन होते. हे बघता सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सुमारे २३ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा देखील सुरजेवाला यांनी यावेळी केला.
एकंदरीत महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले तर सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला जाईल अशी घोषणा काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.
यामुळे 60 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात प्रमुख पीक असणारे सोयाबीनचा हा मुद्दा महाविकास आघाडीला सत्तेच्या जवळ घेऊन जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.